रत्नागिरी जिल्ह्यात आज 3,786 होळ्या प्रज्वलित होणार 
रत्नागिरी

Konkan Holi Festival : आली होळी... आनंदाची उधळण झाली!

रत्नागिरी जिल्ह्यात आज 3,786 होळ्या प्रज्वलित होणार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः होळी आणि रंगपंचमीचा सण म्हणजे आनंदाची उधळण. मात्र, हा आनंद साजरा करताना निसर्गाचे आणि आरोग्याचे नुकसान होऊ नये, यासाठी यंदा पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा विचार अनेक पर्यावरणस्नेही संस्थांनी केला आहे. याला साथ देत होळीच्या अग्नीत प्लास्टिक, टायर किंवा घातक वस्तू न जाळता केवळ लाकूड आणि गोवऱ्यांचा मर्यादित वापर करावा. यामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. ‌‘आपला सण, निसर्गाचे जतन‌’ हा मंत्र जपत यंदाचा शिमगोत्सव साजरा होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. जिल्ह्यातील 18 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोमवार 2 मार्च रोजी एकूण 3786 ठिकाणी होलिका दहन होणार आहे. यामध्ये 1294 सार्वजनिक तर 2492 खासगी होळ्यांचा समावेश आहे. सार्वजनिक होलिका दहन गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी, मंदिर परिसरात किंवा सार्वजनिक मैदानात पारंपरिक पद्धतीने करण्यात येते. तर खासगी होलिका दहन घरगुती किंवा वाडीपातळीवर साजरे केले जाते. यावर्षी जिल्ह्यात सुमारे 1100 ठिकाणी पालखी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पालख्यांमध्ये ग्रामदैवतांची मूर्ती किंवा प्रतिमा सजवून ढोल-ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढली जाते. पारंपरिक पोशाखातील युवक, महिलांची फुगडी, लेझीम पथके, तसेच स्थानिक कलावंतांची सादरीकरणे यामुळे शिमगोत्सवाचा उत्साह अधिक द्विगुणित होतो.

संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखरेख केली जाणार आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रमुख मार्गांवर वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी होळी साजरी करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, ज्वलनशील पदार्थांचा अतिरेक टाळावा आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक शिमगोत्सवाची गरज अलीकडच्या काळात पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT