रत्नागिरी : सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ‘महाजनजागृती मोहीम’ राबविण्यात येणार आहे. पोलीस, बँका आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावागावांत जाऊन महिला व ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर विशेष आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांच्यासह प्रमुख बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सादरीकरणाद्वारे सायबर गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात सायबर गुन्हेगारांनी ८७ लाख रुपयांची रक्कम अवघ्या दोन मिनिटांत मुंबई आणि तामिळनाडूतील खात्यांमार्फत तब्बल १,४०० विविध खात्यांमध्ये वळती केल्याचे त्यांनी सांगितले. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे हाच सर्वांत प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बँकांना महत्त्वाच्या सूचना
ज्येष्ठांच्या खात्यांना सायबर विमा : तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची बचत सुरक्षित राहावी, यासाठी त्यांच्या खात्यांचा सायबर विमा उतरविण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या.
संशयास्पद व्यवहारांवर ‘रेड अलर्ट’ : एखाद्या खात्यातून अचानक मोठ्या रकमेचा व्यवहार झाल्यास बँकांनी खातेदार तसेच पोलिसांना तत्काळ अलर्ट द्यावा.
डेटा सुरक्षेला प्राधान्य : खातेदारांची वैयक्तिक व गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
तपासात तातडीने सहकार्य : सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक माहिती व तांत्रिक सहकार्य पोलिसांना विनाविलंब उपलब्ध करून द्यावे.
सायबर भामट्यांविरोधातील लढाई केवळ पोलिसांची जबाबदारी न राहता ती लोकचळवळ झाली पाहिजे. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्यास सायबर गुन्ह्यांना प्रभावीपणे आळा घालता येईल, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.