जिल्हाधिकारी पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर 
रत्नागिरी

Ratnagiri News : जिल्हाधिकारी पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

पावसाअभावी भातशेती संकटात; नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे मनुज जिंदल यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : निसर्गाची अवकृपा, पावसाने फिरवलेली पाठ आणि ऐन हंगामात पडलेले रणरणते ऊन यामुळे होरपळून निघालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे येथील कातळवाडी, डुगवे परिसरातील शेंडे करपलेल्या, पोकळ दाणा भरलेल्या भातशेतीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

पावसाच्या लहरीपणामुळे शेतात उभी असलेली पिके करपून जात असून पाण्याअभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कातळवाडी येथे पाहणीदरम्यान स्थानिक शेतकरी चंद्रकांत फुटक, कृष्णा फुटक, सदाशिव फुटक, अनिल भाटकर, मोहन फुटक, सुभाष भुवड आदी उपस्थित शेतकरी बांधवांनी पावसाअभावी आणि तीव्र उन्हामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची दाहकता जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.

या पाहणीदरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी सागर मासाळ, उपकृषी अधिकारी कोकणे, सहाय्य‍क कृषी अधिकारी अजय कल्याणकर, महसूल ग्राम अधिकारी सरस्वती वाघमोडे, माजी सरपंच प्रतीक्षा पालवकर आदी उपस्थित होते.

१२०० हेक्टरहून अधिक पंचनामे पूर्ण

यावेळी जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंत सुमारे १२०० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित सर्व गावांमधील पिकांचे पंचनामे स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी व कृषी यंत्रणेमार्फत एक-दोन आठवड्यांत पूर्ण केले जातील.

शासनाकडून भरपाईसाठी प्रयत्नशील

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढणे हेच प्रशासनाचे प्रथम कर्तव्य असल्याचे स्पष्ट करत ते पुढे म्हणाले, पंचनाम्यांचा सविस्तर अहवाल तत्काळ शासनाकडे सादर करण्यात येईल. संकटाच्या या काळात शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून नुकसानभरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. नेटवर्कची अडचण असल्यास उपलब्ध कनेक्शन वापरावे किंवा ॲपमध्ये ऑफलाइन डेटा नोंदवून नंतर कव्हरेजमध्ये आल्यावर अपलोड करावा, अशा त्‍यांनी सूचना दिल्या.

शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सहायक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून तातडीने उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. उर्वरित सर्व बाधित क्षेत्राचे १००% पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

वॉटर बजेटिंग व पाणी नियोजन

नुकसान झालेल्या प्रत्येक घटकाला तातडीने मदत पोहोचवणे आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पंचनाम्यांचे काम पूर्ण होताच शासनाकडून मिळणारी मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून प्रत्येक गावाचे 'वॉटर बजेटिंग' (पाणी अंदाजपत्रक) तयार करण्यास सांगितले. गावातील पाण्याच्या स्रोतांचा शोध घेऊन ऑक्टोबर महिन्यातच टंचाई आराखडा तयार करण्याचे निर्देश ग्रामसेवकांना दिले. पाणीटंचाईच्या काळात गरजेनुसार शेतकऱ्यांसाठी विंधन विहिरी (बोअरवेल) उपलब्ध करण्याचे नियोजनही प्रशासनाकडून केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुमारे २५ वर्षांपूर्वी अशाप्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, त्याचीच पुनरावृत्ती यावर्षी झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी डुगवे येथील शेतीची पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT