रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात एकीकडे धो-धो पाऊस पडत आहे. दुसरीकडे कोकणातील शेतकरी भात, नाचणी पेरणीसाठी लगबग करीत आहे. यंदाच्या 2025-26 सालाकरिता भात व नाचणी पिकाची रोपवाटिका पेरणी 4597.60 हेक्टर झाली असून पुनर्लागवड क्षेत्र 45975.80 इतके आहे. दरम्यान,आज अखेर जिल्ह्यात 43 हजार 620 हेक्टर क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे. उर्वरित पुनर्लागवडीचे काम सुरू असून रोपवाटिकेच्या तुलनेत 94.42 टक्के क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे.
कोकणात मागील काही दिवसांपासून पावसाची जबरदस्त बॅटींग सुरू आहे. दिवस रात्र पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील शेतकरी पावसात भात लागवड करीत आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात 94 टक्के इतक्या प्रमाणात भात लावणीचे कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये रत्नागिरी 7 हजार 293, चिपळूण 7 हजार 74 हेक्टर आणि संगमेश्वर तालुक्यात 6 हजार 404 हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक भात लागवड झाली आहे.
सर्वात कमी मंडणगड तालुक्यात 2 हजार 301 हेक्टर, गुहागर तालुक्यात 2 हजार 742 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित दोन हजार हेक्टर क्षेत्रावर भात, नाचणी पिकाच्या लावणीचे कामे राहिलेली असून जुलै महिन्याच्या अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चालू खरिपातील शेतीच्या लावणीचे पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात सरासरी पाऊस 16 टक्के इतका कमी झाला आहे. त्याचा परिणाम खरीप पेरणीवर झाल्याचे चित्र आहे. अद्याप खरीप पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात खरीप पेरण्या पूर्ण होतील.
जिल्ह्यात भात, नाचणीची इ. पिकांची 94.42 टक्के इतकी पेरणी पूर्ण झाली आहे. 43 हजार20 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून उर्वरित पुनर्लागवडीचे काम सुरू आहे. उर्वरित राहिलेली भात, नाचणी पेरणी काही दिवसांतच पूर्ण होईल.-शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी