रत्नागिरी : राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मिशन सुधार अभियान’ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांची छाननी सुरू केली आहे. काही लाभार्थी अपात्र असताना ही रेशन धान्य उचलल्याचे निदर्शनास आले आहे. या अभियानातून जिल्ह्यातील सुमारे ३७ हजार ४०० लाभार्थी अपात्र ठरल्याने त्यांच्या नावांची शिधापत्रिकेतून वगळणी करण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा विभागाकडून हाती घेण्यात आली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा काळाबाजार रोखणे, पात्र लाभार्थ्यांनाच शासकीय धान्याचा लाभ मिळवून देणे, तसेच मृत, दुबार आणि संशयास्पद लाभार्थ्यांची नावे कमी करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे शासनाच्या धान्य वितरणावरील अनावश्यक खर्चाला आळा बसणार आहे. मृत व्यक्तींची, निवासस्थानी उपलब्ध नसलेल्या तसेच दुबार किंवा संशयास्पद लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीद्वारे तपासली जात आहे. या प्रक्रियेत आढळणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून कमी केली जाणार आहेत. ई-केवायसी न होणे, नाव किंवा पत्ता चुकीचा असणे, दुबार नोंदणी अथवा अन्य तांत्रिक कारणांमुळे पात्र लाभार्थ्यांची नावे वगळली जाणार नाहीत. अशा लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली पात्रता कायम ठेवता येणार आहे.