रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी क्षयरोग विभागाच्या वतीने २४ मार्चपासून क्षयरोग 2.0 मोहीम हाती घेण्यात आली आहे. दिल्लीच्या केंद्रीय क्षयरोग विभागास जिल्ह्यातील ३८८ हायरिस्क गावे मिळाली असून या गावात शिबिरे सुरू आहेत. या शिबिरातून तब्ब्ल ९ हजार १६४ संशयितांची एक्सरेद्वारे तपासणी करण्यात आली आहे. त्यातून १६५ टीबी रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यासह राज्य, देशभरात टीबीमुक्त भारत अभियान सुरू आहे. हायरिस्क गावात घरोघरी जावून सर्वेक्षण, शिबिर घेवून तपासणी करण्यात येत आहे. ६० वर्षावरील व्यक्ती, पुन्हा एकदा टीबी होवून गेलेली व्यक्ती यासह विविध आजार, टीबीची सुरुवात अशा संशयितांची तपासणी करण्यात करण्यात आली. दापोली, मंडणगड, खेड या तालुक्यात शिबिर घेवून तपासण्या करण्यात आल्या. तसेच चिपळूणात शिबिर सुरू आहे. आतापर्यंत १६५ क्षयरोग रूग्ण आढळले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात पाठवले आहे. शिबिरासाठी उपकेंद्रांची टीम, आशासेविका, विविध कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.