चिपळूण, गुहागर तालुक्‍यांत भातशेतीवर करपा रोग 
रत्नागिरी

Ratnagiri News : चिपळूण, गुहागर तालुक्‍यांत भातशेतीवर करपा रोग

पावसाअभावी भात, नाचणी शेती करपली; सप्टेंबरमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाऊस, शेतकरी चिंताग्रस्‍त

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : चिपळूण-गुहागर तालुक्यांत भात व नाचणी पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोग पडला आहे. सप्टेंबर महिन्यात या दोन्ही पिकांना पावसाची आवश्यकता असते. मात्र, याच काळात ५० टक्के कमी पाऊस झाल्याने येथील शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दुष्काळातून वगळलेल्या सहा तालुक्यांचा देखील दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करावा, अशी आग्रही मागणी होत आहे. पावसाअभावी ५० टक्केही पीक हाती लागणार नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

चिपळूण, गुहागर तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे ८० टक्के पाऊस झाला. मात्र, या कालावधीत पावसाची आकडेवारी असमाधानकारक आहे. मार्गताम्हाने, रामपूर, कळकवणे आदी भागांत असमान पाऊस झाला आहे. याचा मोठा परिणाम भात व नाचणी पिकावर होणार आहे. सद्यस्थितीत हाता-तोंडाशी आलेले भातपीक पावसाअभावी फळधारणा न झाल्याने केवळ पेंढाच शेतकर्‍यांच्या हाती पडणार आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिली. गुहागरमध्ये अवघा ४८ टक्के तर चिपळूणमध्ये ५४ टक्के पाऊस झाला. त्यामुळे ५० टक्क्याहून अधिक पावसाची कमतरता भासली आहे.

सप्टेंबरच्या कालावधीत भातपीक फळधारणेस येते. अशावेळी जमीन ओलसर होणे व पाऊस पडणे पिकासाठी आवश्यक असते. मात्र, याच काळात पाऊस न झाल्याने भात व नाचणी पीक अडचणीत आले आहे. भातपिकाच्या शेतात जमिनीला भेगा पडल्या असून आता भातरोपे पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे भातरोपांना दाणा धरणे अशक्य झाले आहे. पावसाच्या अभावामुळे ५० टक्के पीक येणे मुश्कील बनले असून या तालुक्यांचा समावेशही दुष्काळग्रस्त तालुक्यात होणे अत्यंत आवश्यक आहे. या बाबत ग्रामीण भागातील शेतकर्‍यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वेळोवेळी कागदोपत्री पंचनाम्याचे फार्स केले जातात व शेतकर्‍यांना फारशी आर्थिक मदत होत नाही. मुळात कोकणातील शेतकरी पीक कर्ज घेत नाही आणि घेतलेले कर्ज वेळेत फेडतो. त्यामुळे या कर्जमाफीचा कोकणातील शेतकर्‍यांना फारसा फायदा होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी कायम शासकीय मदतीपासून वंचित राहतो.

यावर्षी सरासरी पाऊस २५ टक्क्यांहून अधिक कमी झाला आहे. त्यात सप्टेंबरची आकडेवारी ५० टक्‍क्‍यांहून अधिक खाली गेली आहे. भातपिकाला खरच पावसाची गरज असताना पाऊस न झाल्याने कोकणातील शेतकरी अडचणीत आला आहे. या बाबत शासनाने तत्काळ पंचनामे करावेत. कृषी सेवक, कृषी मंडल अधिकारी, महसूल कर्मचारी यांनी संयुक्तपणे हे पंचनामे करावेत. खरोखरच ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी आणि पंचनामे करताना शेतकर्‍यांची स्वाक्षरी देखील घ्यावी, अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT