देवरूख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चार दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेत दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्यात आला असला, तरी आतील दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाल्याची माहिती आहे.
त्यानंतर ग्रामस्थांनी संशयितांचा पाठलाग करून काही जणांना पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले; मात्र या संशयितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थानी सांगितले. धामणी येथे भालचंद्र सप्रे यांच्या मालकीचे दुकान गाळे असून त्यामध्ये मेडिकल, किराणा व हार्डवेअरची दुकाने आहेत. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दुकानांच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. त्यानंतर चार दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मेडिकल दुकानातील काही रक्कम चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळी दुकानांचे शटर उचकटलेले दिसून आल्यानंतर दुकानदार व ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बाहेरील कॅमेरा फोडण्यात आला असला, तरी दुकानातील दुसऱ्या कॅमेऱ्यात चोरटा कैद झाल्याचे समोर आले. तुरळ परिसरात काही संशयित व्यक्ती ग्रीस लावण्याच्या बहाण्याने फिरताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी ग्रामस्थांनी संशयितांना मारहाण केल्याचेही सांगण्यात येत आहे.
मात्र, संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरही चोरीचा गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समोर आली. संशयितांची सखोल चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि त्यांच्या हालचाली यांची सांगड घातली असती, तर या प्रकरणाचा छडा लागला असता, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
घटनेनंतर त्याच रात्री सावर्डे येथे महामार्गालगत असलेल्या स्पेअरपार्ट दुकानाचे शटर फोडून सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धामणी आणि सावर्डे येथील घटनांमध्ये काही संबंध आहे का, याची पोलिसांनी तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. महामार्गालगतच्या दुकानांना लक्ष्य करणारी फिरती चोरट्यांची टोळी सक्रिय असण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. धामणीत ग्रामस्थांच्या हाती लागलेल्या संशयितांची या पार्श्वभूमीवर सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.