देवरुख ः शहरातील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक वैभव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून रुपेश भागवत व सागर संसारे यांची सर्वानुमते निवड झाली.
नगरपंचायतीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात गुरुवारी आयोजित विशेष बैठकीत उपनगराध्यक्ष म्हणून वैभव पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्याला सर्वांनी अनुमती दिली. यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व मनसे गटाकडून आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे सागर संसारे व भाजपकडून रुपेश भागवत यांचे नाव जाहीर करण्यात आले. यालाही सहमती दिली.यानंतर नगरपंचायतीच्या नूतन इमारतीत नव्याने उभारलेल्या उपनगराध्यक्ष दालनच्या पाटीचे अनावरण करण्यात आले. तसेच उपनगराध्यक्ष दालनचे उद्घाटन वसंत पवार यांच्याहस्ते झाले. त्यांनीच त्यांचे सुपुत्र वैभव पवार यांना उपनगराध्यक्षपदाच्या खुर्चीत बसवले. यावेळी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये व सर्व नगरसेवकांनी वैभव पवार यांचे अभिनंदन केले. तसेच नूतन नगरसेवक सागर संसारे व रुपेश भागवत यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपनगराध्यक्ष वैभव पवार यांनी पालकमंत्री उदय सामंत व आमदार शेखर निकम यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे उपनगराध्यक्ष बनल्याचे नमूद केले. उपनगराध्यक्ष वैभव पवार यांना अडीच वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक यशवंत गोपाळ यांना उपनगराध्यक्षपदाची संधी दिली जाणार आहे. भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून रुपेश भागवत यांना केवळ एक वर्षासाठी संधी दिली आहे, तर राष्ट्रवादी व मनसे गटाकडून सागर संसारे यांना थेट 5 वर्षांसाठी स्वीकृत नगरसेवक केल्याची माहिती आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, सुशांत मुळे, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सदानंद भागवत, राष्ट्रवादीचे बाळू ढवळे, प्रफुल्ल भुवड, संतोष केदारी, राजेंद्र आंबेकर, बाळू घाणेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर व सर्व नगरसेवक उपस्थित होते.