रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी विभागात चार्जिंग स्टेशनचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे गणेशोत्सवानंतर आता दिवाळीत ही ई-बसेस धावण्याची शक्यता धूसरच आहे. त्यामुळे या वर्षभरात चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन वर्षात म्हणजेच 2026 मध्ये रत्नागिरीच्या रस्त्यावर ई-बसेस धावण्याची प्रतीक्षा आहे.
दापोली, रत्नागिरीचे चार्जिंग स्टेशनचे काम प्रगथिपथावर आहे तर खेड, चिपळूणचे काम ही संथगतीनेच सुरू आहे. त्यामुळे एसटी विभाग प्रशासन, लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा रत्नागिरीकरांत होत आहे.
रत्नागिरी विभागात तब्बल 152 नवीन ई-बसेस येणार आहेत.त्यापैकी पहिल्या टप्प्यात 30 ई-बसेस जिल्ह्यात येणार आहेत. गणेशोत्सवात ई-बसेस रस्त्यावर धावतील असे सांगण्यात आले होेते. मात्र प्रत्यक्षात चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णच न झाल्यामुळे मुहूर्त आता दिवाळीतपर्यंत गेला आहे. दिवाळीला अवघा महिना राहिला अद्यापही चार ही चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दिवाळीतही ई-बसेस येणार नाहीत. चार्जिंग स्टेशनचे काम का होईना आणि ई-बसेस रस्त्यावर धावेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 3 महिन्यात चारही चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एसटीतर्फे सांगण्यात येत आहे. नवीन वर्षात ई-बसेस धावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे असले तरी एसटी विभागासह जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवकांनी या सर्व लोकप्रतिनिधींनी रेटा लावल्यास ई-बसेस जिल्ह्यात धावतील, अन्यथा येेरे माझ्या मागल्याप्रमाणे प्रश्न ‘जैसे थे’च राहतील.
येत्या काळात आणखी कित्येक बसेस भंगारात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बससेवा कोलमडून जाणार आहे. नवीन नोकरभरतीबरोबरच जिल्ह्यात ई-बसेस, सीएनजी बसेस, स्मार्ट बसेस आल्यास खर्या अर्थाने बससेवा सुरळीत होणार आहे, गाड्याही वेळेत धावतील. प्रवाशांनाही आरामदायी प्रवास, वेळेत सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.