राजापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून महायुतीचा निर्णय झाल्यास राजापूर तालुक्यातही शिवसेना, भाजपा व मित्र पक्ष महायुती म्हणून या निवडणूका लढवू. मात्र महायुती झाली नाही तर शिवसेना सर्व जागा स्वबळावर लढण्यासही तयार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले यांनी दिली आहे. राजापुरात आलेल्या नागले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील एकूणच व्यूहरचना व पक्षाची भूमिका मांडली.
राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व राजापूर, लांजा साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली आंम्ही काम करत आहोत. त्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणावर विकास कामे झाली आहेत. ग्रामीण भागातही आमच्या शिवसेनेची संघटनात्मक पातळीवर मोठी ताकद आहे. त्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची संख्याही मोठी आहे. अनेक इच्छुकांनी पक्षाकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळावी, असे अर्जही सादर केलेले आहेत. प्रत्येक गण व गटात तीन ते चार जण पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. खास करून वडदहसोळ गट व गणात इच्छुकांची संख्या मोठी आहे. अनेक ठिकाणी पुरुष उमेदवारांबरोबरच महिला उमेदवारांची संख्या देखील मोठी आहे. निश्चितच ही बाब संघटना भक्कम व बळकट असल्याचे द्योतक आहे. या निवडणुकीतही आमदार किरण सामंत जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेला आहे असेही नागले यांनी सांगितले.
राजापूर न. प. निवडणूकीतील पराभव नियोजनाच्या अभावमुळे राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत आमच्याकडूनच थोडी चूक झाल्याचे नागले यांनी मान्य केले. नियोजनातही काही त्रुटी राहिल्यामुळे नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला व थोडक्यात सत्ता हुकली. अगदी उमेदवार जाहीर करण्यास झालेला विलंबही याला कारणीभूत असू शकतो, अशी प्रांजळ कबुलही त्यांनी दिली. मात्र निश्चितच या चुका भविष्यात आम्ही सुधारू व आ. किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाली गती देऊ. या निवडणुकीत अत्यंत सूक्ष्म असे नियोजन करून सर्वच्या सर्व जागा जिंकून पंचायत समितीत सत्ता स्थापन करतानाच जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत राजापूरचा सिंहाचा वाटा असेल, असा दावाही नागले यांनी केला.