NCP BJP Workers join Shiv Sena Shinde Faction  Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Politics | दापोलीत राजकीय भूकंप! जामगे येथे शिवसेना शिंदे गटात राष्ट्रवादी, भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

पुढारी वृत्तसेवा

NCP BJP Workers join Shiv Sena Shinde Faction

खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ घडली असून खेड तालुक्यातील जामगे गाव गुरुवारी (दि. ९) राजकीय हालचालींचे केंद्र ठरले. शिवसेना शिंदे गटाने आयोजित केलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात विरोधी पक्षांतील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करत स्थानिक राजकारणात नवीन समीकरणांची सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष स. तु. कदम यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

याशिवाय, दापोली येथील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय सावंत, सचिन सावंत आणि आर्यन सावंत यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या निर्णयामुळे दापोली-खेड परिसरातील भाजपच्या संघटनात्मक रचनेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या सोहळ्याला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या घडामोडींमुळे खेड-दापोली भागात शिंदे गटाची ताकद वाढल्याचे स्पष्ट होत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांसाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे. स्थानिक राजकारणात नव्या आघाड्यांची चर्चा आता वेगाने सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT