दापोली : दापोली तालुक्यातील गिम्हवणे-धुतारवाडी येथील महिलेचे सोन्याचे दागिने परस्पर बँकेत गहाण ठेवून तसेच कर्जासाठी मिळालेली रक्कम परत न करता एकूण ९ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.१६ वाजता करण्यात आली.
याप्रकरणी पूर्वा गणेश देवघरेकर (वय ३८, रा. गिम्हवणे, धुतारवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतिज्ञा विश्वास देवघरेकर (३१) आणि विश्वास रमेश देवघरेकर (३८, दोघेही रा. गिम्हवणे, धुतारवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ मे २०२६ रोजी संशयित प्रतिज्ञा विश्वास देवघरेकर आणि विश्वास रमेश देवघरेकर यांनी पूर्वा गणेश देवघरेकर यांच्याकडून परिधान करण्यासाठी घेतलेले सोन्याचे दागिने परस्पर बँकेत गहाण ठेवले. यामध्ये सुमारे ६ तोळे वजनाचे मंगळसूत्र असल्याचे नमूद आहे. हे दागिने परत देण्याचे सांगूनही संशयितांनी ते परत केले नाहीत. तसेच प्रतिज्ञा देवघरेकर या विश्वकर्मा महिला मंडळ बचतगटाची अध्यक्षा म्हणून कार्यरत असताना, बचतगटातील महिलांच्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र, फिर्यादी पूर्वा देवघरेकर यांच्या म्हणण्यानुसार बचत गटातील १२ महिलांकडून सुमारे ४ लाख ६० हजार रुपये एवढी कर्जाची रक्कम गोळा करून ती बँकेत भरली नाही. याशिवाय एचडीएफसी बँकेमार्फत बचत गटाच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात मिळालेली १० लाख रुपयांची रक्कम कर्जापोटी परतफेड करण्यासाठी वापरणे अपेक्षित असताना, संशयित पूर्वा देवघरेकर फिर्यादीकडून मिळालेल्या ५ लाख रुपयांची रक्कम कर्जाच्या हप्त्यापोटी भरली नाही.