दापोली : दापोली-खेड या मुख्य राज्य महामार्गाचे डांबरीकरण व इतर विकासकामे गेल्या वर्षभरापासून सुरू असून या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सुरुवातीपासूनच या रस्त्यावरील काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी होत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या कामाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर संबंधित ठेकेदारांकडून घाईघाईत कार्पेट टाकण्यात आले. मात्र हे कामदेखील योग्य पद्धतीने न झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी टाकलेले कार्पेट काही दिवसांतच उखडले असून रस्त्यावर खड्डे, तडे आणि उखडलेले डांबर पुन्हा दिसू लागले आहे.
जवळपास शंभर कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे हे महत्त्वाकांक्षी काम असूनही कामाचा दर्जा पाहता नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अधिकारी वर्ग या कामाची योग्य पद्धतीने देखरेख करत नसल्याने ठेकेदार मनमानी कारभार करत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. दापोली, खेड, रत्नागिरी आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून निकृष्ट कामामुळे प्रवास अधिकच धोकादायक झाला आहे. लोकप्रतिनिधींनी तरी या कामाच्या दर्जाबाबत संबंधित अभियंत्यांना समज द्यावी आणि ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अशा प्रकारे काम सुरू राहिले तर या संपूर्ण प्रकल्पाचे शेवटी चुराडा होईल, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागरिक व स्थानिक कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे.