दापोली किनाऱ्यावर पुन्हा समुद्रात अडकली कार 
रत्नागिरी

Ratnagiri News : दापोली किनाऱ्यावर पुन्हा समुद्रात अडकली कार

प्रशासकीय ढिसाळपणा आणि पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे दुर्घटनांची भीती

पुढारी वृत्तसेवा

दापोली : आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर सावणे येथे कार समुद्रात अडकल्याची घटना ताजी असतानाच ३ मे रोजी सायंकाळी सालदुरे खाडी परिसरात पुणे येथील पर्यटकांची कार चिखलात रुतल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रशासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पर्यटकांच्या बेशिस्त वर्तनावरही नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर वाहन चालवत स्टंटबाजी करत असताना त्यांची कार खाडीकिनारी चिखलात अडकली. घटनेची माहिती मिळताच सालदुरे येथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील महिला, पुरुष व लहान मुलांना सुरक्षित बाहेर काढले. भरती सुरू होण्यापूर्वी वाहन बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी जवळपास तासभर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या मदतकार्यात निवेदन शेवडे, रुपेश शेवडे आणि विपुल शेवडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

दरम्यान, आंजर्ले, हर्णे, मुरुड आणि परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांकडून वाहन चालवण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यामुळे किनाऱ्यावर फिरणाऱ्या पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाहनबंदीचे आदेश असतानाही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी किनारपट्टी भागात कायमस्वरूपी बॅरिकेड्स, सीसीटीव्ही यंत्रणा, नियमित गस्त आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

ग्रामस्थच किती दिवस धावणार?

"ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र प्रत्येक वेळी ग्रामस्थांनीच मदतीला धावून जायचे का? समुद्रकिनाऱ्यावरील वाहनबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे," अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT