रत्नागिरी : कोकणातील पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरीत यंदा पावसाने ओढ दिल्याचा परिणाम आता धरणांच्या पाणीसाठ्यावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. जिल्ह्यातील लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या ३७०.९६ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.), म्हणजेच ७८.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ५ ऑक्टोबरला याच धरणांमध्ये ३८३.३२ द.ल.घ.मी. म्हणजे ८४.८५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे वर्षभरात साठ्यात १२.३६ द.ल.घ.मी.ची घट, तर टक्केवारीत तब्बल ६.०९ टक्क्यांची घट झाली आहे.
जिल्ह्यात लघु-मध्यम प्रकल्पांसह एकूण ७२ धरणे असल्याची माहिती उपलब्ध आहे. सप्टेंबरअखेर पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक धरणांमध्ये अपेक्षित साठा होऊ शकला नाही. २४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यात यंदा २,६१६.४४ मि.मी. पाऊस झाला होता. गतवर्षी याच कालावधीत ३,५९९.६७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच गतवर्षाच्या तुलनेत तब्बल ९८३.२३ मि.मी. पाऊस कमी झाला.
२० प्रकल्प तुडुंब; अनेक धरणे ५० टक्क्यांखाली
धरणांमध्ये एकीकडे समाधानकारक साठा असला, तरी सर्वच प्रकल्पांमध्ये समान स्थिती नाही. उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार २० प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामध्ये शीळ, अर्जुना, मुचकुंदी, ओझर, बारेवाडी, मोर्डे, गुहागर, शिरवली, शेलडी, तळवट, कुरवळ, शिवतर, चिंचाळी, तुळशी, तिडे, शिरसाडी, सोंडेघर, सुकोंडी, पंचनदी आणि रेवली या प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, दुसरीकडे काही प्रकल्पांमध्ये साठा चिंताजनक पातळीवर आला आहे. निवे, कशेळी, परुळे व तेलेवाडी हे प्रकल्प सुमारे ६० टक्क्यांपर्यंत भरले आहेत. तर गडगडी, भोळवली, बेर्डेवाडी, पन्हळे, कळवंडे, येलोंदवाडी आणि तळवडे या प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्याचे आकडेवारीतून दिसते.
ऑक्टोबर हिटचा साठ्यावर परिणाम
सध्या जिल्ह्यात पावसाळा संपण्याच्या टप्प्यात असून उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन वाढण्याची शक्यता आहे. उपलब्ध अहवालानुसार, प्रकल्पांच्या नियोजनात ३ टक्के बाष्पीभवन गृहीत धरले जाते. त्यामुळे आगामी काळात धरणसाठा झपाट्याने कमी होऊ नये, यासाठी पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.