सात थरांच्या मनोऱ्यांनी गोविंदांचा जल्लोष 
रत्नागिरी

Ratnagiri News : थरावर थराचा थरार... जिल्हा दुमदुमला!

दहीहंडी उत्‍सवात विक्रमी मनोरे; सात थरांच्या मनोऱ्यांनी गोविंदांचा जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : ‘गोविंदा आला रे आला...’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या दणदणाटात आणि गोविंदा पथकांच्या थरारक कामगिरीने रत्नागिरी जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाचा रंग चढला. रत्नागिरीसह राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, दापोली, मंडणगड, खेड आदी तालुक्यांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

उंचच उंच मानवी मनोरे रचत गोविंदा पथकांनी हंडी फोडण्यासाठी केलेल्या चित्तथरारक प्रयत्नांनी उपस्थितांची मने जिंकली. विविध ठिकाणी मोठ्या रकमेच्या दहीहंड्या बांधण्यात आल्याने गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी चुरस निर्माण झाली होती. सात थरांचा मानवी मनोरा रचण्याचा विक्रम काही ठिकाणी नोंदविण्यात आला. प्रत्येक थरासोबत वाढणारा उत्साह, हंडी फोडण्याच्या अंतिम प्रयत्नावेळी होणारा जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट यामुळे दहीहंडी सोहळ्याला रंगत आली.पाचल येथे तब्बल १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची विक्रमी दहीहंडी बांधण्यात आली होती. सात थरांची हंडी फोडत गोविंदा पथकांनी पाचलच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली. जिल्ह्याबाहेरील गोविंदा पथकांनीही येथे सहभाग घेतल्याने उत्सवाची रंगत वाढली.मंडणगडमध्ये ओमसाई गोविंदा पथक आणि भिंगळोली येथील कन्हैया गोविंदा पथकाने सात मानवी थरांचा मनोरा रचत तालुक्याच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला. या थरारक कामगिरीला नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

संगमेश्वरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित हिंदुहृदयसम्राट दहीहंडी उत्सवात श्री निनावी देवी गोविंदा पथकाने मानाची दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले. याठिकाणी संगमेश्वर महिला गोविंदा पथक विशेष आकर्षण ठरले. महिलांसाठी डोळ्यांवर पट्टी बांधून काठीच्या सहाय्याने हंडी फोडण्याचा अनोखा उपक्रमही घेण्यात आला. दापोली तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथेही ग्रामस्थांनी उत्साहात दहीहंडी साजरी केली. महिला, युवक आणि बालकांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करत सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचे दर्शन घडले. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. गोविंदा पथके, आयोजक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जिल्ह्यातील दहीहंडी उत्सवाला यंदा विक्रमी उत्साहाची किनार लाभली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT