Cyber Crime (File Photo)
रत्नागिरी

Ratnagiri Crime : रत्नागिरीत सायबर फसवणुकीचे जाळे उघड, ९ पोलिस ठाण्यांत १४ गुन्हे

जिल्ह्यातील विविध बँक खाती ‘मनी म्युल’ म्हणून वापरल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : देशभरात घडलेल्या ऑनलाईन सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारून ती पुढे इतर खात्यांत वर्ग करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बँकांमधील खात्यांचा वापर झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCCRP), सायबर पोलिसांची माहिती आणि बँक व्यवहारांच्या पडताळणीतून रत्नागिरी शहर, राजापूर, चिपळूण, मंडणगड, लांजा, दापोली, गुहागर, रत्नागिरी ग्रामीण आणि खेड या ९ पोलिस ठाण्यांत रविवारी (दि. १९) तब्बल १४ गुन्हे दाखल करण्यात आले.

या कारवाईत बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया तसेच राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील खात्यांचा वापर देशभरातील सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्‍न झाले आहे. काही खात्यांमध्ये पैसे जमा होताच ते काही मिनिटांतच इतर खात्यांत वर्ग करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

रत्नागिरी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका खात्याचा वापर तब्बल ५२ सायबर फसवणूक प्रकरणांमध्ये झाल्याचे निन्‍न झाले असून हे जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रकरण ठरले आहे. चिपळूणमधील दोन खात्यांचा वापर अनुक्रमे ८ आणि ४ प्रकरणांत झाला आहे. मंडणगड, गुहागर, दापोली, लांजा, राजापूर आणि खेड येथील विविध खात्यांमधूनही फसवणुकीची रक्कम स्वीकारून पुढे वर्ग करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), ३(५), माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६ (ब) तसेच फसवणुकीशी संबंधित इतर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित खातेदारांनी आर्थिक मोबदल्यासाठी स्वतःची बँक खाती सायबर गुन्हेगारांना वापरण्यास दिली होती का, की त्यांच्या खात्यांचाही गैरवापर झाला, याचा तपास सुरू आहे.

सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जिल्ह्यातील काही बँक खाती ‘मनी म्युल’ म्हणून वापरली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या व्यवहारांचा अंतिम लाभार्थी कोण, रक्कम पुढे कोणत्या राज्यांत किंवा खात्यांत वळविण्यात आली आणि यामागे संघटित सायबर रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT