रत्नागिरी : महाराष्ट्र सायबर, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने सायबर गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम राबवून ११ म्युल अकाऊंटधारकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच सायबर फसवणुकीतील पीडितांना २ लाख ४२ हजार ५९७ रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
महाराष्ट्र सायबरकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे म्युल अकाऊंटधारक, सीमकार्ड वापरकर्ते, एजंट, मध्यस्थ व इतर संबंधितांचा शोध घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले होते. या मोहिमेत सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ११ म्युल अकाऊंटधारकांविरुद्ध ११ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
जानेवारी २०२६ पासून राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल (एनसीसीआरपी) मार्फत प्राप्त झालेल्या ५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या २१ तक्रारींपैकी १४ प्रकरणांत गुन्हे नोंदविण्यात आले. मनी रिस्टोरेशन मॉड्यूल (एमआरएम) अंतर्गत नोंद झालेल्या १०३ व्यवहारांपैकी ६८ व्यवहारांमध्ये यशस्वी हस्तक्षेप करून एकूण ३ लाख ६० हजार ७८४ रुपये ५२ पैशांपैकी २ लाख ४२ हजार ५९७ रुपये ४१ पैसे पीडितांना परत मिळवून देण्यात आले. तसेच ग्रिव्हन्स रिड्रेसल मॉड्यूल (जीआरएम) अंतर्गत प्राप्त झालेल्या १२ पैकी सर्व १२ तक्रारींचे यशस्वी निवारण करण्यात आले.
रत्नागिरी पोलिस दलाकडून सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या म्युल अकाऊंटस्, बनावट सीमकार्ड, आर्थिक व्यवहारांचे जाळे आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास सुरू असून, अशा गुन्हेगारी नेटवर्कविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपले बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, सीमकार्ड किंवा इंटरनेट बँकिंग सुविधा वापरण्यास देऊ नयेत, तसेच ओटीपी कोणालाही सांगू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सायबर फसवणुकीची घटना घडल्यास तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.