रत्नागिरी : बँक खात्यातून ३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची भीती दाखवत ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगून एका व्यक्तीकडून तब्बल १ कोटी २३ लाख रुपये उकळणाऱ्या संशयिताला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. गगनदीप भारद्वाज (रा. नोएडा, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादीशी संपर्क साधून स्वतःला बंगळूर पोलिस तसेच सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. फिर्यादीच्या माटुंगा (मुंबई) येथील बँक खात्यातून ३ कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याचे सांगत त्यांना घाबरवण्यात आले. त्यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याचे सांगून ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पैशाची मागणी करण्यात आली. या भीतीपोटी फिर्यादीकडून एकूण १ कोटी २३ लाख रुपये उकळण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलिसांच्या पथकाने दिल्ली येथे सापळा रचला. त्यानंतर संशयित भारद्वाज याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस तपास करत आहेत.