रत्नागिरी : कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे ९ तालुक्यातून १३ हजार २३९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. १ हजार ५२५ गावातील ४४ हजार ५३० शेतकरी बाधित झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अंतिम पंचनामे पूर्ण झाले असून नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनास पाठवण्यात आला आहे. दिवाळीपूर्वीच येत्या काही दिवसात कोकणातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी साडेतीन हजार मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडत असतो. यंदा मात्र पावसाने पाठ फिरवली. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाला आणि भातशेती धोक्यात आली. कमी पाऊस झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशामुळे जिल्हा प्रशासनाने ९ तालुक्यात पंचनामे करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले असून ४४ हजार ५३० शेतकऱ्यांचे १३ हजार २३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अंतिम पंचनामे पूर्ण झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तो प्रस्ताव शासनास पाठवला आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.
तीन तालुक्यात अद्याप दुष्काळ जाहीर नाही
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण आणि गुहागर तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला नसून तिन्ही तालुके अद्याप वंचित आहेत. या तीन्ही तालुक्यातील पंचनामे पूर्ण करून प्रस्तावही शासनास पाठवण्यात आला आहे. मात्र शासनाकडून तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत मिळणार का नाही, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.