खेड : दापोली सीमाशुल्क विभागाने केलेल्या धाडसी कारवाईत खेड रेल्वे स्थानकाजवळून दहा किलोहून अधिक अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) जप्त करण्यात आली असून या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सीमाशुल्क विभागाला काही व्यक्ती वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे उल्लंघन करून अंबरग्रीसची अवैध वाहतूक आणि विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली.
१५ आणि १६ जून २०२६ च्या मध्यरात्रीनंतर, १६ जूनच्या पहाटे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड रेल्वे स्थानक परिसरात संशयित रेनॉल्ट क्विड कार अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून १० किलोहून अधिक अंबरग्रीस आढळून आले. याप्रकरणी अंबरग्रीस बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
अंबरग्रीस हा स्पर्म व्हेल (Sperm Whale) या संरक्षित सागरी जीवाशी संबंधित पदार्थ असून वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत त्याची खरेदी-विक्री आणि बाळगणे प्रतिबंधित आहे. त्यामुळे जप्त केलेला माल कायद्यानुसार ताब्यात घेण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) यांनी आरोपींना ३० जून २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून जप्त मालाचा ताबा अधिकृत वन विभागाकडे देण्याचे आदेशही दिले आहेत.
सीमाशुल्क विभागाने नागरिकांना तस्करीविरोधात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या तस्करीबाबत माहिती असल्यास ती ८४२११८८७५० या क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा व्हॉइस कॉलद्वारे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाणार असून शासनाच्या बक्षीस धोरणानुसार संबंधित व्यक्तीला बक्षीसही दिले जाणार आहे.
या कारवाईचे नेतृत्व अतुल पोतदार (अधीक्षक, प्रतिबंधक व गुप्तचर विभाग) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीमाशुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
अंबरग्रीसची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत असल्याने त्याची तस्करी करण्याचे प्रकार अधूनमधून समोर येतात. खेड परिसरात झालेल्या या कारवाईमुळे अशा अवैध व्यवहारांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.