राजापूर-: राजापूर शहरातील कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीतील ‘हॉटेल फुडलँड’मध्ये सोमवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. चार संशयित तरुणांनी हॉटेलमध्ये ग्राहक असल्याचा बहाणा करत प्रवेश केला आणि संधी साधून हॉटेलचे ग्राहक नोंदणी रजिस्टरच लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार हॉटेलबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात गुरुवारी आठवडा बाजाराच्या दिवशी शहरात आणि परिसरात तीन ते चार संशयित महिलाही फिरत असल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता थेट हॉटेलमधून नोंदणी रजिस्टर चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास दोन इसम हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्याकडे रूम उपलब्ध आहे का, अशी चौकशी केली. कर्मचाऱ्याने होकार दिल्यानंतर त्यांनी रूम पाहण्याची मागणी केली. त्यावेळी त्यातील एक जण कर्मचाऱ्यासोबत पहिल्या मजल्यावर रूम पाहण्यासाठी गेला. दरम्यान, खाली उभ्या असलेल्या त्यांच्या साथीदारांनी संधी साधत काउंटरवरील ग्राहक नोंदणी रजिस्टर उचलून बॅगेत टाकल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसून आले.
रूम पाहून खाली आल्यानंतर संबंधितांनी “रूम नको” असे सांगत हॉटेलमधून बाहेर पडले. काही वेळानंतर कर्मचाऱ्याच्या लक्षात रजिस्टर गायब झाल्याचे आले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित संशयित मराठी भाषेत बोलत होते आणि हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर ते हायवेवरील पेट्रोल पंपाच्या दिशेने जाताना दिसून आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच हॉटेल मालक तथा नगर परिषद आरोग्य सभापती सुलतान ठाकूर यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रसारित करून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. हे चारही संशयित अंदाजे २७ ते ३२ वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ग्राहक नोंदणी रजिस्टरच चोरीला नेण्यामागे नेमका हेतू काय, संशयित कोण आहेत, ते कुठून आले होते, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.