रत्‍नागिरी येथे मध्यरात्री आगीत तीन दुकाने जळून खाक 
रत्नागिरी

Ratnagiri Fire : रत्‍नागिरी येथे मध्यरात्री आगीत तीन दुकाने जळून खाक

गॅरेजसह तीन दुचाकी, जनरल स्टोअर्स, फर्निचर दुकानांचे लाखोंचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील साईनगर येथील आरटीओ कार्यालयाजवळ रविवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. या आगीत वेल्डिंग गॅरेज, जनरल स्टोअर्स आणि फर्निचर दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, गॅरेजमधील तीन दुचाकींसह लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले.

रविवारी रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास दुकानांच्या गाळ्यांना आग लागल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला मिळाली. यानंतर दोन्ही दलांच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. हे तिन्ही गाळे मिलिंद जोशी यांच्या मालकीचे असून, त्यामध्ये नारायण चव्हाण यांचे वेल्डिंग गॅरेज, संकेत भूते यांचे जनरल स्टोअर्स आणि नारायण जाधव यांचे फर्निचर दुकान होते. पत्र्याच्या शेडमधील गाळ्यांमध्ये प्रथम गॅरेजला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, त्यानंतर आगीने शेजारच्या दोन्ही दुकानांना वेढले.

एमआयडीसीचे उपअग्निशमन अधिकारी विवेक राणे यांच्या नेतृत्वाखाली एस. डी. महाडिक, डी. एस. दळवी, आर. आर. बाबर, व्ही. के. सावंत, पी. ई. राठोड, पी. व्ही. मोरे, एस. बी. पाटील, एस. जे. गायकवाड, डी. एस. बंडगर तसेच रत्नागिरी नगरपरिषदेचे अग्निशमन कर्मचारी अमोल चवेकर व संकेत कांबळे यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT