File Photo 
रत्नागिरी

Ratnagiri Crime : दारू कमी दिल्याच्या रागातून एकाची दगडाने ठेचून हत्‍या

मंडणगड-शेनाळेतील घटनेने खळबळ; पोलिसांकडून संशयित ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात दारू कमी दिल्याच्या किरकोळ कारणावरून एका ४२ वर्षीय नातेवाईकाची झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवार, २९ जून रोजी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मंडणगड पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मृताचे नाव सदू सखाराम मोकाशी (वय ४२, सध्या रा. शेनाळे) असे असून, प्रकाश गंगाराम वाजे (४०, सध्या रा. शेनाळे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघेही परस्पर नात्यातील असून एकत्रितपणे काम करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दोघांनी मद्यप्राशन केले होते. यावेळी सदू मोकाशी याने प्रकाश वाजे याला अपेक्षेपेक्षा कमी दारू दिल्याचा राग त्याने मनात धरला. त्यानंतर रात्री उशिरा सदू मोकाशी झोपेत असताना त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याची हत्या केली. गंभीर दुखापतीमुळे सदू मोकाशी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पळ न काढता तो तेथेच झोपून राहिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन संशयिताला अटक केली. तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पुरावे संकलित करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून संशयिताची चौकशी, फिर्याद नोंदवणे आणि गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT