खेडमध्‍ये भूस्खलन; दोघांचा ढिगार्‍याखाली मृत्‍यू 
रत्नागिरी

Ratnagiri Rain update : खेडमध्‍ये भूस्खलन; दोघांचा ढिगार्‍याखाली मृत्‍यू

दोन घरे गाडली, वृद्ध महिलेसह तिघेजण बचावले; अन्य तीन घरांमध्येही दगड-माती शिरून नुकसान

पुढारी वृत्तसेवा

खेड : तालुक्यातील दहिवली येथील गुडूपवाडी व शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या भीषण भूस्खलनात दोन घरे पूर्णपणे मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली, तर अन्य तीन घरांमध्ये दगड-माती शिरून मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत एकूण सहा जण अडकले होते. त्‍यापैकी तिघे जण सुखरूप बाहेर पडले, तर एक वृद्ध महिलेला ग्रामस्‍थांनी सुखरूप बाहेर काढले. ढिगाऱ्याखाली अडकलेले अन्‍य दोघांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाने मंगळवारी दुपारी बाहेर काढले.

सतीश शांताराम शेलार (वय ३०) आणि शांताराम बलराम शेलार (८४) अशी मृत व्‍यक्‍तींची नावे असून, त्यांचे मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्‍यान, ७५ वर्षीय कल्पना शांताराम शेलार यांना ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत ढिगार्‍याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले, तर अन्‍य दोघेजण बचावले. कल्पना शेलार यांच्यावर प्रथम कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले.

दुर्घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) सुमारे 30 जवान शोध व बचावकार्यात गुंतले होते. मात्र, मुसळधार पाऊस आणि चिखलामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, सभापती डॉ. आफिया पालेकर, नगराध्यक्ष माधवी बुटाला, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, प्रांताधिकारी वैशाली पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस आदी अधिकारी उपस्थित होते.

धोकादायक कुटुंबांचे स्थलांतराचे आदेश

दरम्यान, पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी परिसरातील धोकादायक ठिकाणी राहणार्‍या कुटुंबांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT