रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देवरुख शाखेला वाहन कर्ज प्रकरणात दिलेला धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणात देवरुखच्या न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांनी मुआज्जम महमद साटविलकर याला दोषी ठरवले. न्यायालयाने बँकेच्या बाजूने निकाल देत साटविलकर याला चेक बाऊन्स प्रकरणात एकूण ३९.५० लाखांचा दंड ठोठावताना साध्या कैदीची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम जमा न केल्यास वाढीव कैदही सुनावली आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा- देवरूख यांनी मुआज्जम महमद साटविलकर यांना वाहन कर्ज वितरित केलेले होते. सदर कर्जाच्या वसुलीपोटी साटविलकर यांनी बँकेला धनादेश दिलेला होता. सदर खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे धनादेश बाऊन्स झाला होता. तरी या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा - देवरूख यांनी न्यायदंडाधिकारी वर्ग १, देवरूख येथे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट १३८ अंतर्गत केस दाखल केली होती. सदर खटल्यामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा - देवरूखचे वकिल ॲड. वाय. जी चंदगडकर यांनी बँकेचे वतीने सादर केलेले दस्तऐवज व युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने मुआज्जम महमद साटविलकर यांना रक्कम रू. ३९.५० लाख दंड व कैद अशी शिक्षा देऊन ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे.
चेकद्वारे दिलेले आश्वासन पाळणे व व्यवहारामध्ये पारदर्शकता राखणे ही कायद्याची मुख्य भूमिका आहे, असे न्यायालयाने परखड मत नोंदविले आहे. या निर्णयानंतर न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झालेला आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.