मोबाईल लोकेशनमुळे उघडकीस आली काजू चोरी 
रत्नागिरी

Ratnagiri News : मोबाईल लोकेशनमुळे उघडकीस आली काजू चोरी

दोन जणांना अटक, ४०० किलोहून अधिक काजू हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी येथील झिमन्स काजू फॅक्टरीतील चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे उघडकीस आणला. मोबाईल लोकेशनच्या मदतीने आरोपींचा माग काढत पोलिसांनी दोन जणांना अटक करत चोरलेल्या काजूपैकी ४०० किलोहून अधिक काजू हस्तगत केला आहे.

काजू चोरीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष भांगणे, हवालदार विजय आंबेकर, अमित कदम व दीपराज पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

सुक्या काजूची ही पहिलीच चोरी असल्याने या व्यवसायातील जाणकार व्यक्तींचा सहभाग असावा, असा पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी काजू फॅक्टरी मालकाकडून फॅक्टरीतून घाऊक काजू खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती, मोबाईल क्रमांक मिळवले. चोरीच्या कालावधीतील मोबाईल लोकेशन तपासल्यानंतर दोन संशयितांचा वावर चोरीच्या ठिकाणाजवळ आढळला. त्यानंतर पोलिसांनी संशयितांशी काजू व्यवहाराच्या बहाण्याने संपर्क साधला. माल खरेदी करण्यासाठी ठरवलेल्या ठिकाणी संशयित आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. तपासात शाहरूख मुराद साखरकर आणि वजीद मोहम्मद अजिज खान हे दोघे काजू फॅक्टरीतून घाऊक काजू खरेदी करून इतर व्यावसायिकांना विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. दोघांनी सुमारे ९०० किलो काजू चोरी केल्याची कबुली दिली. ४०० किलोहून अधिक काजू पोलिसांनी जप्त केला आहे. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन व शिताफीने रचलेल्या सापळ्यामुळे हा गुन्हा उघडकीस आला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT