Crime News File Photo
रत्नागिरी

Ratnagiri Crime : पूर्ववैमनस्यातून एकावर कोयतीने हल्ला

वेरळ स्टॉप येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

लांजा : पूर्ववैमनस्यातून ५९ वर्षीय प्रौढावर कोयतीने हल्ला करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्‍याची घटना बुधवारी सायं. ७ वाजता वेरळ स्टॉप येथे घडली. या घटनेने वेरळ परिसर हादरून गेला आहे.

या कोयती हल्ल्यात प्रभाकर बाबू जाधव (५९, रा. वेरळ बौद्धवाडी, ता. लांजा) असे गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचे नाव असून, त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे अधिक उपचार सुरू आहेत, तर कोयती हल्ला करून संशयित आरोपी जनार्दन गौतम जाधव (३५ वर्षे, रा. वेरळ बौद्धवाडी) हा घटनास्थळवरून फरार झाला आहे. जुन्या वादाचा मनात राग धरून या कोयती हल्ल्याच्या घटनेने लांजा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रभाकर जाधव यांची पत्नी भारती जाधव यांनी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर जाधव व संशयित आरोपी जनार्दन जाधव हे दोघेही एकाच वाडीत राहणारे असून, दोघांमध्ये जुना वाद सुरू आहे. बुधवारी सायं. ७ वा.च्या दरम्यान प्रभाकर जाधव हे मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ बस स्टॉप येथे डिश टीव्हीचा रिचार्ज करण्यासाठी गेले होते. यावेळी जनार्दन जाधव व प्रभाकर जाधव या दोघांमध्ये जुना वाद उफाळला. वाद विकोपाला गेल्याने संशयित आरोपीने अचानक कोयता हातात घेत प्रभाकर जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला व ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी कोयतीचे वार वर्मी खोलवर बसल्याने प्रभाकर जाधव हे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ला केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रभाकर जाधव यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT