देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी येथील 'श्रद्धा हॉटेल अँड लॉज'वर सोमवारी रात्री एका अजब आणि तितक्याच थरारक चोरीची घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास सुटाबुटात आलेल्या तीन अट्टल चोरांनी चक्क फिल्मी स्टाईलने हॉटेलच्या मॅनेजरचे लक्ष विचलित करत काऊंटरमधील ५ हजार ५०० रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.
एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण संगमेश्वर परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. धामणी ब्राह्मणवाडी येथील व्यावसायिक प्रथमेश प्रभाकर घाणेकर यांच्या मालकीच्या या हॉटेलवर सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास नेहमीप्रमाणे शांतता होती. मॅनेजर योगेश बांबाडे हे काऊंटर सांभाळत असतानाच, हॉटेलच्या आवारात एम.एच. के ए ५१/एम.जी./६९०५ क्रमांकाची एक हुंदाई एक्सेट कार येऊन थांबली. या गाडीचा चालक इंजिन चालू ठेवून गाडीतच बसून राहिला, तर गाडीतून उतरलेले त्याचे दोन साथीदार थेट हॉटेलच्या आत शिरले.
त्या चोरांनी अतिशय सभ्य आणि श्रीमंत ग्राहकाचा आव आणत मॅनेजरकडे मुक्कामासाठी चांगल्या रुम दाखवण्याची मागणी केली. त्यांच्या पेहरावावरून मॅनेजरला संशय येण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे मॅनेजर त्यातील एकाला रुम दाखवण्यासाठी वर घेऊन गेला. नेमका याच संधीचा फायदा काऊंटरवर थांबलेल्या दुसऱ्या चोराने घेतला. मॅनेजर नजरेआड होताच त्याने काऊंटरमध्ये हात घालून तिथले मुख्य रजिस्टर आणि ५०० रुपयांच्या ११ नोटा म्हणजेच एकूण ५ हजार ५०० रुपयांची रोकड सराईतपणे लंपास केली.
मॅनेजर रुम दाखवून खाली येईपर्यंत चोरांनी आपले काम फत्ते केले होते. दोघेही तातडीने बाहेर पडले आणि दबा धरून बसलेल्या चालकाच्या गाडीत बसून महामार्गाच्या अंधारात सुसाट वेगाने पसार झाले. मॅनेजर जेव्हा काऊंटरवर परतला, तेव्हा त्याला चोरी झाल्याचा प्रकार समजला.
या प्रकरणी हॉटेल मालक प्रथमेश घाणेकर यांनी मंगळवारी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टरी क्रमांक ५३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संपूर्ण जिल्हाभरात नाकाबंदीचे आदेश दिले असून, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई या टोळीचा अत्यंत वेगाने माग काढत आहेत.