दापोली : दापोली तालुक्यात डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एका उच्चशिक्षित माजी प्राध्यापकाकडून तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक म्हणून नुकतेच निवृत्त झालेले डॉ. मकरंद जोशी यांना ४ नोव्हेंबर ते १९ जानेवारी या कालावधीत आकाश शर्मा, शिवप्रकाश व दया नायक या तिघांनी फोनद्वारे संपर्क साधला. संशयितांनी आपण बेंगळुरू पोलीस व नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले.
तुमच्या नावावर कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) शाखेत खाते असून त्यामध्ये ३ कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याचा बनाव करत, ५० लाख रुपयांचा दंड आणि डिजिटल अरेस्टची भीती दाखवून जोशी यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला.
त्यानंतर संशयितांच्या सूचनेनुसार जोशी यांना ऍक्सिस बँक (तुळजापूर), आयडीएफसी बँक (मुंबई) आणि आयसीआयसीआय बँक (वाशी, नवी मुंबई) येथील खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण १ कोटी २३ लाख रुपये भरायला लावण्यात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. जोशी यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार तिन्ही संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर करत आहेत.
या घटनेमुळे दापोलीसह कोकणातही डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा धोका वाढल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांनी अशा फोन कॉल्सपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.