वेंगुर्ले : कारच्या अपघातानंतर पोलिसांना शिवीगाळ व धमकी प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या साईप्रसाद उर्फ गोट्या विजय नाईक (वय 32, रा. आडेली) यास आज सोमवारी वेंगुर्ले पीएसआय योगेश राठोड यांनी वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी मार्गांवर अतिवेगाने कार चालवीत असताना आडेली येथील युवकाने मठ हायस्कूल समोरील कमानीच्या संरक्षक कठड्यास बुधवारी रात्री जोरदार धडक दिली होती. दरम्यान यावेळी गस्तीवर असणाऱ्या वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तसेच अन्य पोलिसांनी त्यास अपघाताबाबत विचारणा केली असता त्याने संबंधित पोलिसांनाच शिवीगाळ व धमकी दिली होती.
त्यानुसार संबंधितावर वेंगुर्ले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून त्यास शुक्रवारी अटक करण्यात येऊन न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश राठोड हे अधिक तपास करीत आहेत.