रत्नागिरी : इंग्लंडमधील मिडलसेक्स काऊंटी क्रिकेट लीगमध्ये अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रत्नागिरीचा अविराज अनिल गावडे याने आपली छाप उमटवली आहे. २०२५ आणि २०२६ या दोन हंगामांत त्याने फलंदाजीत १,४१७ धावा, तर लेगस्पिन गोलंदाजीच्या जोरावर ११७ बळी मिळवले आहेत. याशिवाय २७ झेल आणि सहा धावबाद अशा कामगिरीसह त्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
इंग्लंडमधील क्रिकेटच्या वातावरणात सातत्यपूर्ण कामगिरी करणे हे खेळाडूंसाठी आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत अविराजने सलग दोन हंगामांत केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. विशेषतः लेगस्पिन गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखत त्याने संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले. २०२५ मध्ये पदार्पणातच सात बळींचा पराक्रमअविराजने २०२५ मध्ये मिडलसेक्स काऊंटी क्रिकेट लीगमध्ये खेळताना अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवली. या हंगामात २० सामन्यांत १९ डाव खेळताना त्याने ९८ च्या स्ट्राईक रेटने ५३६ धावा केल्या. यात नाबाद ११० धावांच्या दमदार खेळीचा समावेश होता. गोलंदाजीतही त्याने प्रभावी कामगिरी केली. संपूर्ण हंगामात ४८ बळी मिळवताना एका सामन्यात अवघ्या २७ धावा देऊन सात फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम त्याने केला. त्याच्या या कामगिरीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला मोठे खिंडार पडले.
२०२६ मध्ये ८८१ धावांसह ६९ बळी२०२५ मधील यशानंतर अविराजने २०२६ च्या हंगामात कामगिरीचा आलेख आणखी उंचावला. २२ सामन्यांत त्याने १०८ च्या स्ट्राईक रेटने ८८१ धावा फटकावल्या. यामध्ये नाबाद ११६ धावांच्या शानदार खेळीचाही समावेश आहे.गोलंदाजीत त्याने २२ सामन्यांत ६९ बळी मिळवले. एका सामन्यात ३० धावा देऊन सहा फलंदाजांना बाद करणे ही त्याची या हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. दोन्ही हंगामांची एकत्रित आकडेवारी पाहता, अविराजच्या नावावर १,४१७ धावा आणि ११७ बळी जमा झाले आहेत. क्षेत्ररक्षणातही अष्टपैलू ठसाफलंदाजी आणि गोलंदाजीतील चमकदार कामगिरीसोबत अविराजने क्षेत्ररक्षणातही आपली छाप पाडली आहे. दोन हंगामांत त्याने २७ झेल टिपले, तर सहा फलंदाजांना धावबाद करण्यात योगदान दिले. त्यामुळे त्याची कामगिरी केवळ धावा आणि बळींपुरती मर्यादित न राहता क्षेत्ररक्षणातही उठून दिसली.
रोहित शर्माकडून मराठीत मार्गदर्शन इंग्लंडमधील क्रिकेट प्रवासात अविराजला भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. रोहितने मराठी भाषेतून केलेले मार्गदर्शन हा त्याच्यासाठी अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.याशिवाय वेस्ट इंडिजचा शमार स्प्रिंगर, श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूज, ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा ख्रिश्चन जॅडलीन आणि पाकिस्तानचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू झाहिद अली व मोहम्मद वाहिद यांच्यासोबत सराव करण्याची आणि खेळण्याची संधीही त्याला मिळाली. या खेळाडूंच्या सहवासातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बारकावे आणि उच्च दर्जाच्या खेळाचा अनुभव घेण्याची संधी अविराजला मिळाली.