संगमेश्वर ः महामार्गावर पडलेल्या भेगा पहिल्या छायाचित्रात, तर दुसर्‍या छायाचित्रात डांबर टाकून बुजवण्यात आलेले खड्डे. pudhari photo
रत्नागिरी

रत्नागिरी: महामार्गावर तडे, काम रखडले; अपघात वाढले

Cracked highways: खड्डे बुजवण्याचे कामही अर्धवट; वळणांचा धोका कायम; काँक्रिटच्या रस्त्याला भेगा

पुढारी वृत्तसेवा

आरवली ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम रडतखडत सुरू आहे. चौपदरीकरण करत असताना कोणतीही सुरक्षा पुरवली जात नसल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे. तसेच या अपघातप्रवण क्षेत्रात वाहनांचे अपघातही घडत असून जखमी आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील खड्डे त्वरित न बुजवल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर महामार्ग ठेकेदाराने खड्डे बुजवण्यास सुरवात केली. मात्र खड्डे बुजवण्याचे काम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचे अपघात घडत आहेत.

चौपदरीकरण करत असताना महामार्गावर धावणार्‍या वाहनांची सुरक्षा घेणे आवश्यक असते; मात्र ठेकेदार कंपनीकडून अशा कोणत्याही प्रकारची यंत्रणा उभारली जात नसल्याने महामार्ग धोकादायक बनत आहे.

चौपदरीकरणाचे काम करत असताना शासकीय अधिकार्‍यांची देखरेख असणे आवश्यक असते; मात्र कोणताही अधिकारी या ठिकाणी नसल्याने चौपदरीकरणाला कोणी वाली नसल्याचे चित्र संगमेश्वर तालुक्यात दिसून येत आहे. चौपदरीकरण करत असताना सुरुवातीला अपघातग्रस्त रामपेठ वळण तसेच शासकीय विश्रामगृहासमोरील धोकादायक वळण हटवण्याची मागणी करण्यात येत होती; मात्र धोकादायक वळणे हटवली जात नसल्याने अपघात सुरूच असून, जीव गमवावा लागत आहे.

संगमेश्वर सोनवी पूल ते पुनर्वसन आणि शास्त्रीपूल ते संगमेश्वर या भागातील काम गेले तीन वर्षे रखडलेले आहे. रखडलेल्या कामाचा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसत आहे. संगमेश्वर शास्त्रीपूल, पैसाफंड हायस्कूलजवळ तसेच अनेक भागात काम रखडले आहे. महामार्गावर पडलेले खड्डे त्वरित न बुजवल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरवात झाली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलावर रस्त्याला भेगा पडल्याने चिंता व्यक्त होत आहे. आरवली येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून उड्डाणपुलापर्यंत रस्त्यांची उंची वाढवण्यात आली आहे; परंतु हे बांधकाम निकृष्ट होत असल्याचे रस्त्याला पडलेल्या भेगांवरून कळून येत आहे.

यातील काही भेगा डांबराने बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पावसाळ्यामध्ये पुलाखालील भाग पाण्याने वाहून गेला त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने मातीचे भराव आणून टाकले होते. एकूणच आरवली असो वा मुंबई-गोवा महामागचि अन्य उड्डाणपूल असो, या उड्डाणपुलांच्या बांधकामावेळी प्रवासीहित कितपत जपले जात आहे, याबाबत प्रश्नच आहे.

डेडलाईन हुकली

राज्यातील लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन कोकणातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी दिली होती. मात्र, सध्या सुरू असलेले महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असून, या मार्गावरील अनेक पुलांची कामे अद्याप अपूर्णच आहेत. या महामार्गवरील कामे पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागणार आहे. त्यामुळे डिसेंबर 2024 ही डेडलाईन हुकली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT