रत्नागिरी ः मंगळवारी सायंकाळी शहरातील एकता मार्ग येथे सापडून आलेल्या गोमांसामुळे संतप्त सकल हिंदू समाजाने बुधवारी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेतली. गेल्या 10 महिन्यांत रत्नागिरीत 4 गोहत्या झाल्या असून पोलिसांकडून संशयितांवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याची संतप्त भावना त्यांनी पोलिस अधीक्षकांसमोर मांडली.
पोलिस विभागाला गोमांस विक्री तसेच कत्तल होणार्या ठिकाणच्या तळांची माहिती देउनही पोलिस विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. ज्या प्रमाणे गांजावर कारवाई करण्यासाठी पोलिस गस्त किंवा साध्या वेषात सापळा रचून कारवाई करतात, त्याप्रमाणे पोलिसांनी गोमांस वाहतूक तसेच विक्री होत असलेल्या ठिकाणीही गस्त तसेच सापळा रचून कारवाई करण्याची मागणी सकल हिंदू संघटनेने यावेळी पोलिस अधीक्षकांकडे केली.
तसेच फक्त संशयितांवर नव्हे तर गोहत्येमधील सर्व रॅकेटचा छडा लावून सूत्रधाराला अटक करून तातडीने आणि कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. म्हणणे ऐकून घेतल्यानंतर एसपी नितीन बगाटे यांनी संशयितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सकल हिंदू समाजाच्या पदाधिकार्यांना यावेळी दिले. पोलिस विभाग आपले काम चोख करेल, असे सांगितले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईंणकर, पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.