कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या कुरिअर वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर थरारक दरोड्याचा प्रयत्न मंगळवारी पहाटे करण्यात आला. ब्ल्यू डार्ट कुरिअर कंपनीचा हा कंटेनर अडविण्यासाठी कारने पाठलाग करत त्याच्यावर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी सुजल सचिन पवार (वय 21, रा. झाराप), राहुल अमित शिरसाट (19, रा. कुडाळ), प्रशांत नितीन सावंत (24), प्रज्वल नितीन सावंत (21, दोघे रा. वेताळबांबर्डे), मंदार सोनू उमरकर (19, रा. कुडाळ) व राहुल सदानंद नलावडे (19, रा. पावशी) या सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या सहाजणांना कुडाळ न्यायालयाने 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
मनोज कुमार पाल (वय 31, मिर्जापूर, उ. प्र.) हा मयुरेश्वर लॉजिस्टिक्स, भिवंडी येथे चालक म्हणून कार्यरत आहे. 29 डिसेंबर रोजी सकाळी तो भिवंडी येथून ब्लूडार्टच्या सागर कॉम्प्लेक्स गोडाऊनमधून किंमती माल भरून गोवा (वेर्णा) येथे निघाला. त्याच्या सोबत सहकारी चालक म्हणून मुनेश पाल होता. सोमवारी रात्री राजापूर येथील ढाब्यावर जेवण करून त्यांनी पुढे गोव्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. दरम्यान ओसरगाव टोलनाका ओलांडल्यावर महामार्गाच्या कडेला उभ्या राखाडी रंगाच्या बलेनो कारमधील युवकांनी महामार्गावर येथे कंटेनर थांबण्याचा इशारा केला. मात्र रात्रीची वेळ व कंटेनरमध्ये मौल्यवान माल असल्याने चालक मनोज कुमार याने गाडी न थांबवता पुढे जाणे पसंत केले. यानंतर सदर बलेनो कार (एमएच 07 एएस 0194) ही हॉर्न वाजवत कंटेनरचा पाठलाग करत असल्याचे चालकाच्या निर्दशनास आले. यामुळे घाबरलेल्या चालक मनोज कुमार याने सहकारी मुनेश पाल याला माहिती दिली तसेच मोबाईलवरून ट्रान्सपोर्ट कार्यालयाला माहिती दिली.
चालकाने झाला प्रकार मॅनेजर शिवराम पराडकर यांना सांगितला. त्यानंतर तात्काळ कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. कुडाळ पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संशयित बलेनो कारसह सहा तरुणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे सुजल सचिन पवार (रा. झाराप), राहुल अमित शिरसाट (रा. कुडाळ), प्रशांत नितीन सावंत, प्रज्वल नितीन सावंत (दोघे रा. वेताळ बांबर्डे), मंदार सोनू उमरकर (रा. कुडाळ) व राहुल सदानंद नलावडे (रा. पावशी) अशी सांगितली. फिर्यादीने ओळख पटविल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंटेनर थांबविण्यासाठी दगडफेक
मध्यरात्री सुमारे 1 च्या सुमारास पणदूर परिसरात संशयितांनी कारने कंटेनरला ओव्हरटेक केले आणि पुढे अरुंद रस्त्याजवळ कार महामार्गावर आडवी लावून अडथळा निर्माण केला. कारजवळ पाच ते सहा तरुण थांबले होते. त्यांनी कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न करत अचानक दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात कंटेनरच्या डाव्या बाजूचा आरसा फुटला; मात्र प्रसंगावधान राखत चालक मनोज पाल याने गाडी न थांबवता थेट कुडाळ एमआयडीसीतील ब्ल्यू डार्ट गोडावून गाठले