माखजन ः संगमेश्वर तालुक्यातील आंबवपोंक्षे येथे सध्या प्रधान मंत्री सडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू आहे. या कामात ठेकेदाराकडून मनमानी सुरू असून, शेतकर्यांच्या शेतीचे अनधिकृत नुकसान करत काम करण्यात येत आहे.
रस्त्याचे काम करताना शेतातून गटारे काढल्याने येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या रस्त्याची लांबी 9 मीटर इतकी असल्याने तेवढी जागा देण्यासाठी शेतकर्यांनी अनुमती दिली. परंतु, सध्या जेसीबीच्या साहाय्याने चुना मारलेल्या रेषेच्या बाहेर जाऊन शेतीची अनधिकृत खोदाई करण्यात आली आहे. याची शेतकर्यांनी ग्रामपंचायतीत तक्रार केल्यावर या रस्त्याचा ठेकेदार ग्रामपंचायतीच्या कोणत्याच सूचनांकडे लक्ष देत नसल्याची माहिती आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीचे सरपंच शेखर उकार्डे यांनी सांगितले. ही बाब गंभीर असून, ठेकेदारावर कारवाई ची मागणी होत आहे.
तुरळ हरेकर वाडी मार्गे सरंद-आंबव पोंक्षेमार्गे आरवली असा रस्ता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला. वास्तविक पाहता हा रस्ता मंजूर होण्याआधी मागणी करताना जागा जाणार्या शेतकर्यांची कोणतीही लेखी नाहरकत घेतली गेली नव्हती. रस्ता मंजूर झाल्यावर प्रत्यक्ष कामापूर्वी या विषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीने शेतकर्यांची नाराजी दूर करत रस्त्यासाठी 9 मीटर इतकी जागा देण्यासाठी अनुकूल केले. या कामात आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीने यशस्वी मध्यस्थी केली होती. गेल्यावर्षी कामाला सुरुवात झाली व त्यानंतर 9 मीटर लागणार्या जागेसाठी चुना टाकण्यात आला. पण सध्या या रस्याचे मातीकरण व गटारे खोदण्यात आली आहेत. शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानी बद्दल आंबव पोंक्षे ग्रामपंचायत जमीन अधिग्रहण करताना दाखवलेली तत्परता आत्ता दाखवत नसल्याचे चित्रं आहे.
चुकीच्या पद्धतीने खोदलेली गटारे यामुळे शेतकर्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. विनाकारण तोडलेली झाडे,गटारापालिकडच्या शेतीत जाण्यासाठी पाईप देखील टाकण्यात आलेले नाहीत. शेतात जाण्यासाठी मार्गच नाही. या सर्वच प्रकाराबद्दल आता आंबव पोंक्षे ग्रामपंचायत काहीही लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. शेतकर्यांची जमीन मिळण्यासाठी आंबव पोंक्षे ग्रामपंचतीने केलेली मध्यस्थी आता शेतकर्यांच्या नुकसान संदर्भात जाब विचारण्यासाठी का केली जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. या संदर्भात शेतकर्यांनी आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता ठेकेदार आमच्या सुचनांकडे लक्ष देत नसल्याचे सांगितले.
जोवर अनधिकृत काम सुधारणा करून केले जात नाही तोवर डांबरीकरणाचे पुढील काम करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे. हे काम देखील धीम्या गतीने सुरू असून, मातीकरण होऊन बरेच दिवस झाले तरी पुढील काम होत नसल्याने धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकर्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी विशेष सभा लागावी व तत्काळ चुकीच्या कामात सुधारणा करावी, अन्यथा 26 जानेवारीला आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले जाईल, असा येथील एका शेतकर्याने दिला आहे.