रत्नागिरी : पाईप लाईनची गळती शोधण्यासाठी खोदण्यात आलेला खड्डा.  
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्नागिरीत प्रदूषित पाणीपुरवठा

टी.जे. मरीन कंपनीची सांडपाणी पाईपलाईन फुटली; मुरुगवाडा, मिरकरवाड्याला फटका

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा आणि मिरकरवाडा परिसरात नागरिकांच्या नळातून थेट दुर्गंधीयुक्त, दूषित आणि आरोग्यास घातक पाणीपुरवठा झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. एमआयडीसी परिसरातील टी. जे. मरीन या कंपनीच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली आणि त्याचे प्रदूषित दुर्गंधीयुक्त पाणी थेट नगर परिषदेच्या पिण्याच्या पाण्यात मिसळले.

या प्रकरणात टी. जे. मरीन कंपनीकडून प्रदूषित पाणी प्रक्रिया करून पाईपलाईनद्वारे भगवती बंदराकडे समुद्रात सोडले जाते. मात्र, ही पाईपलाईन मुरुगवाडा येथील पांढरा समुद्र परिसरात फुटली. या गळतीमुळे दुर्गंधीयुक्त सांडपाणी मोठ्या प्रमाणावर परिसरात साचले आणि याच भागातून जाणाऱ्या नगर परिषदेच्या पाणीपुरवठा लाईनमध्ये ते झिरपले. परिणामी, नागरिकांच्या घराघरांतून थेट घाणेरडे, दुर्गंधीयुक्त पाणी नळातून येऊ लागले. ‌‘हे पाणी पिणे तर दूरच, तर हात-पाय धुतले तरी प्रचंड दुर्गंधी येते‌’, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. ‌‘नळातून पाणी येतंय की थेट सांडपाणी?‌’ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या घटनेची माहिती संबंधित कंपनीला देऊनही सकाळपर्यंत कंपनीचा एकही प्रतिनिधी घटनास्थळी फिरकला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांचा आरोप आहे की, पाईपलाईन आधीपासूनच जीर्ण अवस्थेत होती.

यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापक मोहम्मद यांनी सांगितले की, कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत लिकेज शोधून दुरुस्तीचे काम सुरू आहे. लवकरच गळती थांबवण्यात येईल. तसेच, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी भिडे यांनी सांडपाणी पाईपलाईनला गळती लागल्याची कबुली दिली आहे. कर्मचारी घटनास्थळी काम करत असून, लवकरच दोष दूर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT