राजापूर : तालुक्यातील पाचल येथे दोन तलाठी कार्यालये आणि एका मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतींसाठी भूमिपूजन होऊन तब्बल दहा महिने उलटले तरी प्रत्यक्ष बांधकामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे, जुन्या इमारती निर्लेखित करून जागाही मोकळी करण्यात आली आहे. कार्यारंभ आदेश आणि भूमिपूजनाचा सोपस्कार पूर्ण होऊनही बांधकामाची एकही वीट रचली न गेल्याने पाचलमधील शासकीय कार्यालयांच्या कामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठेकेदारांच्या दिरंगाईबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राजापूर तालुक्यात ६१ तलाठी कार्यालये आणि ११ मंडळ अधिकारी कार्यालयांच्या इमारती मंजूर करण्यात आल्या आहेत. यापैकी बहुतांश ठिकाणी बांधकामे पूर्णत्वाच्या दिशेने गेली असताना, तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ असलेल्या पाचलमध्ये मात्र तीन महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांची कामे रखडली आहेत. जानेवारी २०२६ मध्ये अपूर्वा सामंत यांच्याहस्ते या इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र नोव्हेंबर २०२६ उजाडला तरी प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तलाठी कार्यालयांच्या बांधकामाची जबाबदारी 'निर्माण कन्स्ट्रक्शन', तर मंडळ अधिकारी कार्यालयाच्या बांधकामाची जबाबदारी 'श्रीमाता कन्स्ट्रक्शन' यांच्याकडे आहे. या कामांपैकी काही कामे स्थानिक ठेकेदारांना पुढे देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पाचल येथील तीन कार्यालयांच्या कामाची जबाबदारीही एका स्थानिक ठेकेदाराकडे देण्यात आल्याचे समजते.
जून २०२५ मध्येच जुन्या इमारती निर्लेखित करून बांधकामासाठी जागा मोकळी करण्यात आली होती. त्यानंतर टाईप प्लॅनमध्ये आवश्यक बदल करून तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही कामाला सुरुवात का झाली नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून कामाच्या सद्यस्थितीबाबत विचारणा केली असता, संबंधित ठेकेदाराकडून तांत्रिक कारणांचा आधार घेत वेळकाढूपणा केला जात असल्याची चर्चा आहे. दहा महिन्यांचा कालावधी उलटूनही बांधकाम सुरू न झाल्याने शासनाच्या निधीचा आणि वेळेचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकारात सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप ठोस कारवाई का केली नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील अन्य गावांमध्ये शासकीय कार्यालयांच्या इमारती उभ्या राहत असताना पाचलसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेच्या ठिकाणी तीन कार्यालयांची कामे रखडणे ही गंभीर बाब आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालये ही ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे..
ठेकेदारांच्या दिरंगाईला जबाबदार कोण?
दहा महिने उलटूनही बांधकामाची साधी सुरुवात न होण्यामागील नेमकी कारणे प्रशासनाने स्पष्ट करावीत. संबंधित ठेकेदारांना काम सुरू करण्याबाबत तातडीने आदेश देऊन कामाच्या प्रगतीचा कालबद्ध आढावा घ्यावा आणि विनाकारण विलंब होत असल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पाचल परिसरातील नागरिकांकडून होत आहे, अन्यथा या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.