रत्नागिरी : मागील काही वर्षांत पावसाळ्यामध्ये उधाणाच्या लाटांच्या माऱ्यामुळे किनारपट्टीची धूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली असून, किनाऱ्याच्या संरक्षणासाठी बंधाऱ्यांची मागणी सातत्याने होत होती. राज्य सरकारने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण 25 संवेदनशील ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याच्या कामांना प्राधान्य दिले असून काही ठिकाणी या कामांना सुरुवात झाली आहे. या सर्व कामांसाठी शासनाने 78 कोटींहून अधिकचा निधी मंजूर केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांत पावसाळ्यामध्ये उधाणाच्या लाटांच्या माऱ्यामुळे समुद्रकिनाऱ्याची मोठ्याप्रमाणात धूप होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी सुरुची झाडे लाटांच्या माऱ्यामुळे उन्मळून पडत आहेत. किनाऱ्याच्या दिशेने समुद्र सरकत आहे. त्यामुळे अनेकठिकाणी किनाऱ्यावर बंधाऱ्याची मागणी करण्यात आली होती. पतन विभागाने दिलेल्या माहितीनंतर महाराष्ट्र शासनाने यासाठी जिल्ह्यात 25 किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी बंधाऱ्यांच्या कामाला मान्यता दिली होती व त्यासाठी निधीही मंजूर केला होता.
रत्नागिरी तालुक्यातील आरे आणि नेवरेयेथील कामांना प्राधान्याने सुरुवात होणार आहे. आरे येथे 825 मीटर लांबीच्या बंधाऱ्यासाठी 8 कोटी 19 लाख 80 हजार 764 रुपये, नेवरे येथे 525 मीटर लांबीच्या कामासाठी 5 कोटी 23 लाख 87 हजार 673 रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. रत्नागिरीतील गणेशगुळे येथे 7 कोटी 92 लाख 32 हजार रुपये खर्चाचा 1,172 मीटर लांबीचा बंधारा, भाट्ये येथे 6 कोटी 33 लाख 81 हजार रुपये खर्चाचा 884 मीटरचा बंधारा आणि गावखडी येथे 7 कोटी 9 लाख 35 हजार रुपये खर्चाचे संरक्षक काम हाती घेण्यात आले आहे. तसेच गुहागर तालुक्यात वेळणेश्वर (वेंगणी) येथे 5 कोटी 53 लाख 59 हजार, रत्नागिरीत घेरापूर्णगड येथे 2 कोटी 93 लाख 77 हजारांच्या निधीतून संरक्षक भिंती, बंधारे उभारले जात आहेत.
विशेष म्हणजे गणपतीपुळे येथील संवेदनशील किनाऱ्यासाठी 30 लाख 36 हजार रुपयांच्या जिओ बॅग्स बंधाऱ्याचे कामही होणार आहे. दापोली तालुक्यातील किनारपट्टीच्या गावांमध्येही या योजनेचा मोठा विस्तार झाला आहे. आडे येथे 3 कोटी 53 लाख 12 हजार, कर्दे (भाग 1) येथे 3 कोटी 53 लाख 5 हजार, तर कर्दे (भाग 2) येथे 4 कोटी 92 लाख 23 हजार. कोळथरे येथे 3 कोटी 52 लाख 69 हजार, लाडघर येथे 4 कोटी 22 लाख 39 हजार आणि मुरुड येथे 5 कोटी 63 लाख 7 हजार व 5 कोटी 64 लाख 24 हजार रुपयांची दोन स्वतंत्र कामे मंजूर आहेत. हर्णे (भाग 1 व 2) मिळून सुमारे 8 कोटी 30 लाखांहून अधिक निधीतून बंधारे बांधले जात आहेत. पाजपंढरी येथे 3 कोटी 51 लाख 39 हजार, बुरोंडी येथे 3 कोटी 53 लाख 5 हजार, पाडलेमध्ये 3 कोटी 97 लाख 97 हजार आणि साळुंद्रे येथे 4 कोटी 58 लाख 49 हजारांच्या निधीला तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. करंजगाव येथे 3 कोटी 89 लाख 46 हजार रुपयांचे कामही यात समाविष्ट आहे. यातील अनेक कामांनी आता वेग घेतला आहे. रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये समुद्रकिनारीही बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.