रत्नागिरी : इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी आणि पालक प्रचंड तणावाखाली आहेत. प्रवेशाबाबतची अनिश्चितता, भविष्याची चिंता आणि वाया जाणारा वेळ यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या या दिरंगाईबद्दल पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दहावीचा निकाल लागून बराच काळ लोटला तरी कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आणि विज्ञान, वाणिज्य की कला शाखा निवडायची, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. प्रवेश निश्चित नसल्याने त्यांना अभ्यासाला सुरुवात करता येत नाही. ही अनिश्चितता आणि भविष्याची चिंता विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण निर्माण करत आहे. काही विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जात असल्याची भीती पालक व्यक्त करत आहेत. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधा आणि माहितीच्या अभावामुळे अधिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मुलांच्या भविष्याच्या चिंतेने पालकही हवालदिल झाले आहेत. प्रवेशासाठी विविध महाविद्यालयांमध्ये चौकशी करण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे.
प्रवेशाची रम आणि इतर खर्चाचे आर्थिक नियोजन करणेही त्यांना कठीण झाले आहे. शासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना पालकांमध्ये प्रबळ होत आहे. शिक्षण संस्थांनीही याप्रकरणी हतबलता व्यक्त केली आहे. एकंदरीत या लांबलेल्या प्रवेश प्रक्रियेचा विद्यार्थी आणि पालक या दोघांच्याही शैक्षणिक आणि वैयक्तिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून प्रवेश प्रक्रियेतील अडथळे दूर करावेत आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.