रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील धार्मिक, ऐतिहासिक, शैक्षणिक विकास कामांमुळे शहराची ओळख बदलण्याच्या मार्गावर आहे. रत्नागिरी शहरात मंडळ किंवा दोन जिल्ह्यांसाठी काम करणारी प्रमुख शासकीय कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालये रत्नागिरी शहरात असल्याने सध्या या शहराची प्रशासकीय शहर म्हणून ओळख आहे. शहरातील प्रतिपंढरपूर म्हणून परिचित असलेल्या विठ्ठल मंदिराचे नूतनीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. इतरही धार्मिक स्थळांचा विकास झाला असल्याने रत्नागिरी शहर प्रशासकीय बरोबरच धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाण्याच्या मार्गावर आहे.
राज्यातील प्रत्येक लहान-मोठ्या शहराची एक विशिष्ट ओळख असते. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आळंदी, शेगांव, अक्कलकोट ही धार्मिक पर्यटनस्थळे म्हणून सुपरिचित आहेत. त्याचप्रमाणे रत्नागिरी शहर हे आतापर्यंत प्रशासकीय शहर म्हणून ओळखले जाते. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील शैक्षणिक विकासाची अनेक दालने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे हे ठिकाण कोकणातील शिक्षण हब म्हणून ओळखले जाऊ शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.रत्नागिरी शहरात आणि लगतच्या परिसरातील धार्मिक स्थळांचा विकास होत आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य पुतळे उभारले गेले आहेत. शिवसृष्टीही साकारली गेली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलून त्याच्या दर्शनी भागाला विमानतळाप्रमाणे लूक देण्यात आला आहे. थिबा राजाकालीन बुद्ध विहाराची वास्तूही उभारली जाणार आहे. त्यामुळे हे शहर ऐतिहासिक पर्यटन शहर म्हणून ओळखले जावू शकते.
शहरातील अनेक धार्मिक स्थळांचा विकास होत आहे. त्यात आता रत्नागिरीतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिराचे नूतनीकरण होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी विठ्ठल मंदिर संस्थेच्या पदाधिकार्यांशी बैठक घेतली. सुमारे 3 कोटी रुपये खर्च करून होणार्या मंदिर नूतनीकरणाचा आराखडा कसा आहे याची माहिती वास्तू विशारद यांच्याकडून देण्यात आली. मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंदराव उर्फ नाना मराठे यांच्यासह माजी नगराध्यक्ष अशोक उर्फ मामा मयेकर, प्रमोद रेडिज, भाजपचे माजी नगरसेवक राजेश तोडणकर, माजी शहर अध्यक्ष राजन फाळके तसेच विजय पेडणेकर, पराग तोडणकर, संकेत मयेकर, प्रवीण हेळेकर आदी या बैठकीला उपस्थित होते. विठ्ठल मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या या बैठकीत काही बदल सुचवून नूतन मंदिराचा आराखडा निश्चित करण्यात आला. सध्या या कामाचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी गेला असल्याचे सांगण्यात आले. नूतनीकरणासाठी आवश्यक असणारे ना-हरकत पत्र मंदिर संस्थेकडून देण्यात आले.