रत्‍नागिरी : आढावा बैठकीत बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे. यावेळी वाहतूक निरीक्षक, ट्रॅव्‍हल्‍सचे प्रमुख उपस्‍थित होते.  
रत्नागिरी

Ratnagiri News : शहरात केवळ निश्चित थांब्यावरच बसेस थांबणार

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिवहन विभागाचा निर्णय; बस वाहतूकदारांना कडक सूचना

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : सुट्टीच्‍या हंगामामुळे शहरात वाहतूक विस्‍कळीत होत आहे. बसेस कुठेही थांबत आहे. बसेसच्‍या थांब्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही. प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय होईल अशाप्रकारे नियोजन करण्यात यावे. केवळ निश्चित थांब्यावरच बस थांबवावी इतर कुठेही मध्ये बस थांबवता येणार नाही, असे आदेश बस वाहतूकदार यांना उपप्रादेशिक परिवनह अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नुकतीच शहरातील वाहतूक व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने परिवहन विभाग, पोलिस विभाग व खासगी प्रवासी बस वाहतूकदार यांची बैठक पार पडली. प्रवासी बसेस मुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत जाधव, सुदेश पाटील, केतन पाटील, गजानन कोळी, वाहतुक शाखेचे शरद घाग, राजेंद्र देवरूखकर यांच्‍यासह ट्रॅव्‍हलसचे महेश साळवी, हरिश्चंद्र चव्हाण, ऋषीकेश कामत, संदेश गुरुनाथ निकम, अविनाश श्रीधर खेडेकर, दत्तात्रय कोंदणकर, रुपेश शिंदे, विशाल कदम, यश कांबळे, सागर लिंगायत, अमेय साळवी, विनायक दळी आदी उपस्‍थित होते.

सुट्टीच्या हंगामामुळे रत्नागिरी ते मुंबई पुणे प्रवासी वाहतुकीमध्ये वाढ झालेली आहे. याचसोबत शहरामध्ये रस्ते विकासाची कामे देखील चालू आहेत. त्यामुळे शहरात सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढलेली असून वाहतूक कोंडी सारख्या समस्या उद्भवत आहेत. विशेषतः शहरातील प्रवासी बस थांब्यावर ही समस्या जास्त उद्भवत आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग व खाजगी बस वाहतुकदार यांनी संयुक्त सर्वेक्षण करून सुरक्षित बस थांबे निश्चित करण्यात येत आहेत. त्‍याचठिकाणी बसेस थांबवाव्‍यात. यासोबतच बस सुटण्याच्या वेळेचे नियोजन करण्यात येणार असून एकाच वेळी सर्व वाहतुकदार यांनी बसेस न सोडता टप्याटप्याने सोडाव्यात अश्या सूचना देण्यात आल्या. बस चालकांनी बसेस थांबवताना वाहतुकीचा अंदाज घेऊन योग्यप्रकारे खबरदारी घेऊनच शिस्तीत बस थांबवाव्यात अश्या सूचना देण्यात आल्या. यासाठी या बस चालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

कागदपत्रे जवळ बाळगा

बसधारकांनी वाहनाची सर्व कागदपत्रे जसे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा व प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र यांच्या वैधतेची तपासणी करावी तसेच बसमध्ये आपत्कालीन दरवाजा आणि अग्निशमन यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करावी अशा सूचना देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT