जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : मँगो सिटी म्हणून ओळख असलेल्या कोकणातील रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील शहरी बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. 100 हून बसेसची मागणी आणि शहर हद्दबरोबरच परिसरातील गावांना गरज असताना केवळ 30 सिटी बसेसद्वारे बससेवा सुरू आहे. यातील काही बसेस भंगारात गेल्या असून आणखी काही बसेस भंगारात जाण्याची वाटेवर आहे. यामुळे अनियमित वेळा, तोकड्याबसेसमुळे शहरातील प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार संतापले आहेत.
शहराच्या बससेवा तोकड्या पडत असल्यामुळे ग्रामीण बसेसवर अवंलबून राहावे लागत आहे. त्यामुळे शहरी बससेवेकडे एसटी विभाग, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असून सिटी बसला बुस्टर डोस देण्याची गरजा आहे. रत्नागिरी आगारात ई-बसेस आल्यास, नवीन मिडीबसेस आल्यास खऱ्या अर्थाने प्रश्न मिटणार.
रत्नागिरी जिल्हा तसा पर्यटनाचा जिल्हा तसेच मँगो सिटी, भाताचे कोठार म्हणून जास्त ओळख आहे. त्यामुळे विविध राज्यातून दरवर्षी लाखो-करोडो पर्यटक कोकणातील रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात येत असतात. रत्नागिरी शहराबरोबरच जिल्ह्याचा विकास होत असून नवीन एसटी बसस्थानक सुरू झाले. मात्र सिटी बससेवेची दुर्दशा झाली आहे. बोटावर मोजण्याइतके बसेस चांगल्या आहेत. उर्वरित बसेस जुन्या, गंजक्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. दररोज नोकरदार, व्यापारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, बाहेरून आलेले पर्यटक असे हजारो-लाखो प्रवासी शहरातून प्रवास करीत असतात. मात्र शहरी बससेवा बघून रत्नागिरीकर अक्षरशा वैतागले असून संताप ही अनावर झाला आहे. बसेस वेळेवर येत नाही, कधी कधी तर ठरलेल्या रूटवर तीन तीन दिवस बसेस येत नाही त्यामुळे पालक-आगार प्रमुखाबरोबर वाद होत आहेत. त्यामुळे शहरी बससेवा पूर्ववत, चांगली आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी चांगल्या बसेस, तसेच ई-बससेवा लवकरात लवकर सुरू केल्यास खऱ्या अर्थाने शहर बससेवेला बुस्टर डोस मिळेल.यामुळे प्रवाशांना चांगली सेवा, उत्पन्न मिळेल, पर्यटन ही वाढेल.
रत्नागिरी शहर, कुवारबाव, कारवांचीवाडी, रेल्वे स्टेशन, हातखंबा, जांभरूण, वैतोशी, काजरघाटी, खेडशी, वेळवंड, झरेवाडी, मालपवाडी, चांदोर, वरवडे, नाटे, हर्चे, तोणदे, चांदेराई, खंडाळा, आरेवारी, आडे, हातीस, काजरेकोंड, आंबेकोड, कांबळेवाडी, डफळवाडी, पानवळ यासह विविध गावांत शहर बससेवा जाते.