नागरिकांचा महावितरणमध्‍ये मध्यरात्री ठिय्या 
रत्नागिरी

Ratnagiri News : नागरिकांचा महावितरणमध्‍ये मध्यरात्री ठिय्या

चिपळूण शहरातील संतप्त नागरिकांनी खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : शहरात आलेल्या २०२१च्या महापुरात मुरादपूर सबस्टेशन येथून उपनगरासाठी वीजपुरवठा करणारी ३३ के.व्ही. वाहिनीची योग्य दुरुस्ती न केल्याने गेले दोन दिवस या सबस्टेशनमधून वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या उपनगरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे काँग्रेस नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी सोमवारी रात्री वीज मंडळ कार्यालयावर नागरिकांसह धडक देत पहाटेपर्यंत ठिय्या आंदोलन केले.

शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्‍या आहेत. तसेच नागरिकांच्या तक्रारींकडेही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वीज मंडळाच्या कामकाजाबाबत चिपळूण शहर परिसरातील नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. एकीकडे प्रचंड उष्मा वाढला असतानादेखील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटनांमुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत होत आहेत. प्रामुख्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर त्याचे परिणाम होत आहेत. तसेच बाजारपेठेतील व्यावसायिक व खासगी आस्थापनांवरही परिणाम होत आहे.

मुरादपूर सबस्टेशनवरून शहरातील उपनगर भागात वीजपुरवठा होतो. मात्र या सबस्टेशनच्या निर्मितीनंतर कामाच्या दर्जाबाबत गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ शंका उपस्थित होत आहेत, तर २६ जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात सबस्टेशनमधून काही उपनगर भागांना वीजपुरवठा करणाऱ्या ३३ के.व्ही वीजवाहिनीमध्ये दोष निर्माण झाले. परिणामी गत दोन दिवसांपासून उक्ताड, बायपास, पेठमाप, मुरादपूरचा काही भाग, गोवळकोट, खेंड, बाजारपेठ याठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांसह नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी सोमवारी रात्री ११ वाजल्यानंतर वीज मंडळ कार्यालयात परिसरातील नागरिकांसह जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर सरगुरोह यांच्यासह नागरिकांनी पहाटेपर्यंत वीज मंडळ कार्यालयाच्या परिसरातच बैठे आंदोलन सुरू केले. अखेर पहाटेच्या सुमारास अधिकाऱ्यांनी सबस्टेशनमधील वीजवाहिनीतील तांत्रिक दोष दूर करण्यासह ३३ के.व्ही. वीजवाहिनी बदलण्याबाबत आश्वासन दिल्याने नागरिकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र सरगुरोह यांनी सबस्टेशन व वीज वाहिनीतील तांत्रिक दोष कायमस्वरूपी दूर न झाल्यास यापुढे नागरिकांचा संताप अनावर होऊन मोठे जनआंदोलन झाल्यास त्याला संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असाही इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT