चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर बुधवारी पहाटे भीषण कार अपघात झाला. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन लहान बालकांसह पाचजण जखमी झाले आहेत.
या अपघातात संजय जाधव (रा. मार्कंडी, चिपळूण) यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तसेच जखमींमध्ये अप्रीन सावंत (वय ४४, रा. मुंबई), रिधा मोडक (वय २८, रा. मुंबई), उजर मुल्ला (९, रा. चिपळूण), रिया मुल्ला (वय ३६, रा. चिपळूण) आणि आईन मुल्ला (४, रा. चिपळूण) यांचा समावेश आहे. सर्व जखमीवर सध्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ४.२५ वाजण्याच्या सुमारास कार क्रमांक एमएच ०८ बीई १७४२ ही मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येत होती. वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्यालगत खड्ड्यात कोसळली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थेच्या रुग्णवाहिकेतून जखमींना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.