चिपळूण : युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र इंधन टंचाई सुरू असताना कोळसा भट्ट्या आता जोरात धगधगू लागल्या आहेत. अनेक हॉटेलमध्ये चुलीवरचे जेवण सुरू झाले असून त्याला कोळशाचा तडका दिला जात आहे. तालुक्यातील टेरव भागात इंधन टंचाईत कोळसा भट्ट्या जोरात आहेत. त्यामुळे ही इंधन टंचाई भट्टीवाल्यांच्या पथ्यावर पडली आहे.
कोकणात लाकूड भट्टी लावण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र अलिकडे बंदी तिथे चांदी असाच रिवाज पडला आहे. गुटखा बंदी, गावठी दारू बंदी, गांजा चरस बंदी, प्लास्टीक पिशवी बंदी अशा अनेकप्रकारच्या बंदी शासनाने आहेत. मात्र या बंदी झुगारून राजरोसपणे सर्वत्र अवैध प्रकार सुरू आहेत. त्याचपद्धतीने कोळसा भट्टी बंदीचादेखील फज्जा उडाला आहे.
चिपळूण शहरापासून जवळ असणाऱ्या डोंगर भागातील टेरव येथे अनेक कोळसा भट्ट्या धगधगू लागल्या आहेत. सकाळच्या वेळेत किंवा रात्री मुंबई-गोवा महामार्गावरून येता-जाता येथील भट्टीचा धूर दृष्टीसदेखील पडतो. टेरव भागातील लिंगेश्वर मंदिर परिसर, दत्तवाडी रोड, देवशेत परिसर, टेरव बुद्रूक वराडी, राधाकृष्णवाडी मंदिर परिसर, वेतकोंड गाव परिसर आदीठिकाणी या कोळसा भट्ट्या धगधगत आहेत. येथील काही भट्ट्या व्यावसायीक टेरव परिसरातील जंगलातील लाकूड तोडतात आणि भट्टीसाठी ते वापरतात. त्यातून तयार होणारा कोळसा जिल्ह्याभरातील हॉटेल व्यावसायीक, तंदूर भट्टीवाले आदी ठिकाणी विकला जातो.