चिपळूण : चिपळूण-धामणंद मार्गावर खांदाट गवळवाडी येथील चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात २१ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १८ प्रवाशांसह दोन चालक आणि एका वाहकाचा समावेश आहे. हा अपघात शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झाला. सर्व जखमींना तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
चिपळूणहून चोरवणेच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणकडे येणारी एसटी बस खांदाट गवळवाडी येथील वळणावर समोरासमोर धडकल्या. धडक जोरदार असल्याने दोन्ही बसेसमधील अनेक प्रवाशांना दुखापत झाली. यामध्ये दोन्ही एसटी बसेस समोरासमोर आदळल्याने अनेक प्रवाशांच्या डोक्याला, जबड्याला, हनुवटीला जोरदार मार बसला. यात काहींचे दातही पडले आहेत. तीव्र उतार आणि धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
दोन्ही एसटी बसेसचे मोठे नुकसान
अपघातानंतर घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढून कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात एसटी बसेसचे मोठे नुकसान झाले आहे.