चिपळूण नगर परिषद 
रत्नागिरी

Ratnagiri News| पालकमंत्र्यांच्या माध्यमातून न.प.ला ८ कोटी निधी

चिपळूण न. प. सभेत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची माहिती; विविधप्रश्‍नी जोरदार वादंग

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : चिपळूण नगर परिषदेला शहरातील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आठ कोटी रुपये निधी मिळाल्याची माहिती नगराध्यक्ष सकपाळ यांनी नगर परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिली.

या सर्वसाधारण सभेत सुमारे ३५ विषय मंजुरीसाठी होते. बहुतांश विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, काही मुद्द्यांवर विषयांतर झाले. यावेळी चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार शाब्दिक चकमकी उडाल्या. त्यामध्ये शहरातील एकल महिला सर्वेक्षणावरून साजिद सरगुरोह यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांवर चुकीच्या पद्धतीने कामकाज करीत असल्याचा आरोप केला. यावर शशिकांत मोदी यांनी, आरोप करून महिलांचा अवमान करू नका, यासंदर्भात कुठला अधिकारी वा अन्य व्यक्तींनी हस्तक्षेप केला असल्याचा पुरावे द्या असे सांगितले. यावरून सरगुरोह आणि मोदी यांच्यात सुमारे वीस मिनिटे आरोप-प्रत्यारोपांच्या वादाचा आखाडा रंगला. अखेर नगराध्यक्ष सकपाळ यांनी हस्तक्षेप केला.

तसेच अन्य विषयात, उबाठा सेनेचे विकी नरळकर यांनी चर्चेदरम्यान प्रशासनाला पाणीपुरवठ्यासंदर्भात आपण यापूर्वीही गंभीर सूचना दिल्या होत्या. त्या पद्धतीने आजपर्यंत कामकाज न झाल्याने भविष्यात चिपळूणला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे असे मुद्दे उपस्थित करीत असतानाच नगरसेविका रसिका देवळेकर यांनी, विषयांतर करू नका. पत्रिकेवरील विषयांवर चर्चा करा असे सांगितले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर नगराध्यक्ष सकपाळ यांनी यात हस्तक्षेप करीत ‘सभागृहाचे पावित्र्य राखा, असे सांगण्याची वारंवार वेळ आणू नका’ सांगून वादावर पडदा टाकला.

त्यानंतर मूळ विषय पत्रिकेतील बहुतांश विकासकामांच्या प्रस्तावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. दरम्यान, विकासकामांसाठी आवश्यक निधी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्याकरिता प्रस्ताव पाठविणे तातडीची गरज आहे. मात्र प्रशासनाच्या तांत्रिक अडचणी व काही चुकांमुळे प्रस्ताव वेळेत जात नसल्याबद्दल नगराध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. तरीही सुमारे आठ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती देत यापुढे प्रशासनाने कामांचे प्रस्ताव वेळेत तयार करावेत, अशी सूचना केली. भविष्यातील पाणी संकट विषयावर शहरातील खासगी, सार्वजनिक तसेच नगर परिषद मालकीच्या विहिरी तातडीने स्वच्छ करून त्या पिण्यायोग्य वापरावयास आणण्याची मंजुरी घेण्यात आली.

दरम्यान, प्रशासकीय कामकाजावर काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करताना मंजूर केलेली कामे व सभागृहाने घेतलेल्या निर्णयाची प्रशासनाकडून वेळेत अंमलबजावणी केली जात नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. पाणी सभापती निहार कोवळे यांनी पुन्हा एकदा मालमत्ता विभागाला लक्ष्य करताना नगर परिषद मालकीच्या जागेतील खोक्यांमधून अद्यापही अनधिकृत व मान्यता नसलेले व्यवसाय सुरू आहेत.

मार्कंडी येथील एका खोक्यात चक्क चिकन विक्री सुरू आहे. त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली होती. तसेच त्याचा करारनामाही झालेला नाही. असे असताना या व्यावसायिकावर कारवाई प्रशासनाने का केली नाही? याठिकाणी मोठे हायस्कूल आहे. विद्यार्थ्यांचा परिसरात वावर असतो. चिकन विक्रेता त्याच्याकडील वाया गेलेले घटक भटक्या कुत्र्यांना टाकत असतात. त्यामुळे भटकी कुत्री टोळक्याने या परिसरात वावरतात. शाळेतील विद्यार्थ्यांचा पाठलाग करतात. त्यामुळे सुरक्षा आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही बाब वारंवार निदर्शनास आणूनही संबंधितावर कारवाई का होत नाही, असा मुद्दा उपस्थित करतानाच संबंधित विक्रेत्यावर सभागृहाचे कामकाज संपण्यापूर्वी कारवाई करावी, अशी सूचना कोवळे यांनी देताच नगराध्यक्ष सकपाळ यांनी, याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

तसेच घरपट्टी कराची वाढलेली रक्कम, रस्ता रुंदीकरण, अतिक्रमण हटाव मोहीम यावरही गांभीर्याने चर्चा झाली. नगरसेवक मोदी यांनी घरपट्टीसंदर्भात वाढलेल्या कराच्या रकमेचे संबंधित ठेकेदाराकडून कशा पद्धतीने कामकाज केले याची माहिती सभागृहाला मिळावी अशी मागणी केली. यावरून काही काळ नगराध्यक्ष व मोदी यांच्यात शाब्दिक वाद झाला.

तसेच शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विहिरी स्वच्छ करून घ्याव्यात, अशी मागणी नगरसेवक प्रमोद बुरटे यांनी केली. साजिद सरगुरोह यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेताना सहा महिन्यांपूर्वी शहरात लोखंडी जाहिरात फलक बसविले व त्यावर प्रशासनाने काय कारवाई केली त्याचा अहवाल द्यावा, अशी मागणी केली. एकूणच अनेक विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. काही विषयांवरून नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT