चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, तर नगरसेवक पदासाठी 141 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज (मंगळवारी) या अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या उपस्थितीत छाननी झाली. यामध्ये नगराध्यक्ष पदाचे 3 तर नगरसेवक पदाचे 10 उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले.
नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र देवळेकर (ठाकरे शिवसेना), विनिता सावर्डेकर (अपक्ष), लियाकत शाह (काँग्रेस) या तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत 8 उमेदवार राहिले आहेत तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र. 1 (ब) मधून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशा कदम, दीपक निवाते, प्रभाग क्र. 2 (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) मुनीर सहिबोले, प्रभाग 3 (ब) मधून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कादीर मुकादम, प्रभाग 4 (अ) मधून नितीन गोवळकर, प्रभाग 5 (ब) मधून शिंदे शिवसेनेच्या सुवर्णा साडविलकर, प्रभाग 6 (ब) मधून महमूद पाते (शरद पवार राष्ट्रवादी), प्रभाग 11 (अ) मधून शरद पवार राष्ट्रवादीच्या युगंधरा शिंदे, प्रभाग 11 (ब) मधून शिंदे शिवसेनेचे अंकूश आवले, प्रभाग 11 (ब) मधून काँग्रेसचे सुधीर शिंदे यांचे उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल भोसले यांनी ही छाननी केली.